चिमुरड्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिली पत्रे !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 02:04 PM2020-03-30T14:04:37+5:302020-03-30T14:05:15+5:30
कोरोनाचा उद्रेक आणि त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती याचे गांभीर्य लहान मुलांनाही समजत आहे.
प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : आपला देश मोठ्या संकटात सापडला आहे, असे आई-बाबा सांगत आहेत. बातम्यांमधूनही आम्हाला दररोज कोरोनाबद्दलची माहिती मिळते. सर्व डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी आमच्यासाठी झटत आहेत. घरीच थांबण्याचे आपली आणि कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहनही तुम्ही करत आहात. आम्ही लहान असलो तरी बाहेर जाण्याचा हट्ट करणार नाही. आई-बाबांचे आणि तुमचे ऐकू, तुम्ही सुरू केलेल्या स्वच्छता अभियानाचे काटेकोर पालन करू. मोठेपणी शास्त्रज्ञ होऊन भविष्यात देशाला अशा संकटातून बाहेर काढण्यासाठी सज्ज राहू, असे आश्वासन चिमुरड्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. विद्योदय मुक्तांगण परिवाराच्या माध्यमातून पत्रे लिहिण्यात आली असून, ती पंतप्रधान कार्यालयाला पाठविली जाणार आहेत. कोरोनामुळे यंदा शाळा लवकर बंद करण्यात आल्या. लॉकडाऊनमुळे सध्या घरातून बाहेर पडणेही शक्य नाही. सुटीतील मोकळ्या वेळेचा सदुपयोग व्हावा, यासाठी विद्योदयचे विनायक माळी आणि सार्शा माळी यांनी ऑनलाईन सेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून विज्ञानाचे धडे गिरवून घेण्यास सुरुवात केली आहे. पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली अशा विविध भागांमधून विद्यार्थी या उपक्रमाशी जोडले गेले आहेत. शास्त्राशी संबंधित प्रयोग, गमतीजमती, विविध विषयांवर चर्चा असे या सेशनचे स्वरुप आहे. यात कोरोनाचीही चर्चा झाली. यातूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहावे, अशी कल्पना मुलांना सुचल्याचे विनायक माळी यांनी ' लोकमत' ला सांगितले. कोरोनाचा उद्रेक आणि त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती याचे गांभीर्य लहान मुलांनाही समजत आहे. मुले पालकांबरोबर टीव्ही पाहत असतात. पंतप्रधान देशाला काय आवाहन करतात, याचीही त्यांना कल्पना आहे. त्यामुळेच आम्ही तुमच्याबरोबर आहोत हे सांगण्यासाठी आणि आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मुलांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. ऑ नलाईन सेशनचाही मुले मनापासून आनंद लुटत आहेत, असे विनायक माळी म्हणाले.
................
छोट्यांना कळतं, तर...
पत्रात पुण्यातील साई वाईकर म्हणते, की मोदीजी, तुम्ही सध्या ज्या उपाययोजना करीत आहात, त्यामुळे देशाचाच फायदा होणार आहे. बऱ्याच लोकांना अजून विषाणूचे गांभीर्य कळालेले नाही. आम्ही लहान मुले ऐकू शकतो तर मोठी माणसे का ऐकत नाहीत, असा प्रश्न पडतो. आपल्या देशाची भावी सुसंस्कृत नागरिक म्हणून मी तरी तुमच्या सर्व सूचनांचे पालन करेन आणि घरातच राहीन.
....................
आम्ही राहू घरातच
रुची शेटे म्हणते, ‘आपले पोलीस रात्रंदिवस रस्त्यांवर पहारा देत आहेत आणि डॉक्टर रुग्णांची सेवा करण्यात गुंतलेले आहेत. मोठ्यांचे माहीत नाही; मात्र आम्ही सर्व लहान मुले तुमच्याबरोबर आहोत. तुम्ही सांगेपर्यंत आम्ही घरातच खेळू, घराच्या बाहेर जाणार नाही आणि अडचणी वाढवणार नाही.
...............................
स्वच्छता पाळणार
निषाद पाटसकरने लिहिले आहे, की मी स्वच्छतेचे सर्व नियम पाळतो. आपले घर, परिसर स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे, असे बाबांनी आणि आजोबांनी मला सांगितले आहे. मोठेपणी मला शास्त्रज्ञ होऊन देशसेवा करायची आहे.