पुस्तकांच्या गावी बालकुमारांचा मेळा?
By admin | Published: May 3, 2017 02:40 AM2017-05-03T02:40:27+5:302017-05-03T02:40:27+5:30
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था पुनरुजीवित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. संस्था नव्याने अस्तित्वात आल्यानंतर
प्रज्ञा केळकर-सिंग /पुणे
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था पुनरुजीवित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. संस्था नव्याने अस्तित्वात आल्यानंतर, आगामी बालकुमार साहित्य संमेलन महाबळेश्वरजवळील भिलार गावात आयोजित करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यासंदर्भात शासनाशी लवकरच पत्रव्यवहार करून पुस्तकांच्या गावी बालकुमारांचा मेळा भरवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जाणार आहे.
संस्थेची धर्मादाय आयुक्तांकडे नव्याने नोंदणी करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. जुन्या संस्थेचे कोषाध्यक्ष अनिल कुलकर्णी यांनी संस्थेची कागदपत्रे नव्या समितीकडे हस्तांतरित केली असून, पुढील आठवड्यात यासंदर्भातील बैठक होणार आहे. या बैठकीला आजी-माजी पदाधिकारी उपस्थित राहणार असून, जुने वाद सोडून सर्वानुमते सकारात्मक निर्णय घेतला जाणार असल्याची चर्चा आहे. धर्मादाय आयुक्तांकडे संस्थेची नोंदणी झाल्यानंतर, बालकुमार साहित्य संमेलनासाठी भिलारचा प्राधान्याने विचार केला जाणार आहे.
अमरेंद्र गाडगीळ यांनी १९७६ मध्ये अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था या नावाने संस्थेची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केली होती. सुधाकर प्रभू, श्यामला शिरोडकर, गजानन क्षीरसागर, दत्ता टोळ, दामोदर पाठक, रमेश मुधोळकर, म. वि. गोखले, लीला दीक्षित, श्रीधर राजगुरू आणि भालबा केळकर यांचा संस्थेच्या विश्वस्तांमध्ये समावेश होता. दोन तपानंतर विश्वस्तांच्या मान्यतेने अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था असे नामकरण करण्याचा ठराव संमत झाला. जुन्या संस्थेच्याच नोंदणी क्रमांकावर १५ वर्षे काम सुरू होते. या पार्श्वभूमीवर झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये संस्थेचे नव्याने कामकाज सुरू करण्यासाठी घटनादुरुस्ती करण्यात आली. संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण संस्थेने मंजूर केलेल्या ठरावाप्रमाणे संस्थेची नवीन घटना करण्यासाठी समिती नेमण्यात आली. यामध्ये डॉ. वि. वि. घाणेकर, माधव राजगुरू, मुकुंद तेलीचरी आदींंचा समावेश होता.
जुन्या संस्थेचे कोषाध्यक्ष अनिल कुलकर्णी यांनी संस्थेचा सर्व लेखाजोखा; तसेच कागदपत्रे मागील आठवड्यात नव्या समितीतील मुकुंद तेलीचरी, माधव राजगुरू यांच्याकडे सुपूर्त केली आहेत. पुढील आठवड्यात अखिल भारतीय बालकुमार संस्थेची नोंदणी, नवीन कार्यकारिणी निवड याबाबत बैठक होणार आहे. या बैठकीत विसर्जित संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनाही पाचारण केले जाणार आहे. जुन्या वादावर पडदा टाकून आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील वाटचाल ठरवली जाणार असल्याचे समितीचे सदस्य माधव राजगुरु यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
राजगुरु म्हणाले, ‘अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्थेची नोंदणी, नवीन कार्यकारिणी याबाबत तातडीने प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे. कागदपत्रांसंदर्भात जुन्या कार्यकारिणीला यादी देण्यात आली होती. त्यानुसार, बहुतांश कागदपत्रे प्राप्त झाली असून, त्यांची पडताळणी केली जाणार आहे. संस्थेच्या नोंदणीअभावी गेली दोन वर्षे बालकुमार साहित्य संमेलन
झालेले नाही.
बालसाहित्याची चळवळ बळकट व्हावी, या उद्देशाने यंदा संमेलन पार पडावे, यासाठी महाराष्ट्रातील सर्वच बालसाहित्यिक उत्सुक आहेत. त्यामुळेच नोंदणी प्रक्रिया वेगाने पार पाडण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. प्रक्रिया सुरू असतानाच संमेलनाची तयारी करता येईल का, याबाबतही विचार केला जाणार आहे. पुस्तकांच्या गावाची ओळख मिळत असतानाच, बालकुमार साहित्य संमेलनासाठी भिलारचा प्राधान्याने विचार केला जाईल.’
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था अस्तित्वामध्ये आल्यानंतर आगामी बालकुमार साहित्य संमेलनासाठी शेगाव, बारामती आणि महाबळेश्वर अशा तीन ठिकाणांहून निमंत्रणे आली आहेत.
पुढील पिढीला वाचनाची गोडी लावण्याच्या दृष्टीने शासनातर्फे भिलारमध्ये पुस्तकांचे गाव साकारत आहे. त्यामुळे आगामी बालकुमार साहित्य संमेलन नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात भिलारला आयोजित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
यादृष्टीने शासनाशी लवकरच पत्रव्यवहार केला जाणार असल्याचे संस्थेचे माजी कार्यवाह सुनील महाजन यांनी सांगितले.