शाळेकडून प्रवेशासाठी मुलांच्या मुलाखती
By admin | Published: December 4, 2014 04:55 AM2014-12-04T04:55:22+5:302014-12-04T04:55:22+5:30
शिक्षण हक्क कायद्यानुसार पूर्व प्राथमिक शाळेतील प्रवेशासाठी लहानग्या मुला-मुलींची मुलाखत घेण्यास बंदी
पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार पूर्व प्राथमिक शाळेतील प्रवेशासाठी लहानग्या मुला-मुलींची मुलाखत घेण्यास बंदी असताना हा कायदा राबविणाऱ्या शिक्षण संचालकांच्या शाळेमध्येच आज मुलाखती सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या शाळेवर कारवाई होणार, असा प्रश्न समोर आला आहे. दरम्यान, शिक्षण संचालकांनी शाळेकडून उद्या सायंकाळपर्यंत याबाबतचा खुलासा मागविला आहे.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत पूर्वप्राथमिक शाळेत मुलाखती घेण्यास मनाई असली, तरी अनेक शाळांत हे प्रकार सर्रास घडत आहेत. पुणे स्टेशनमधील सरकारी मध्यवर्ती इमारतीसमोर एका बड्या इंग्रजी शाळेत बुधवारी मुलांच्या मुलाखती सुरू होत्या. याची कार्यक्रमपत्रिका शाळेने इमारतीच्या बाहेर बोर्डावर लावली होती. काही पालकांनी शिक्षण संचालकांकडे तक्रार केली. याबाबत कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. संबंधित शाळा ही जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात येत असल्यामुळे याबाबत खुलासा मागविण्यात आला असल्याचे शिक्षण उपसंचालक राजेंद्र बोधने यांनी सांगितले. (प्रतिनिधी)