आंबेगाव तालुक्यात शालेय विद्यार्थिनीच्या डोळ्यात टाकली मिरची पावडर; पालकांमध्ये भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 02:26 PM2023-10-25T14:26:41+5:302023-10-25T14:27:02+5:30
मिरची पावडर टाकलेल्या मुलीच्या बहिणीच्या अंगावर स्प्रे मारण्याची घटनाही याच रस्त्यावर काही दिवसांपुर्वी घडली होती
अवसरी : अवसरी खुर्द ता.आंबेगाव गावच्या हद्दीत भोर मळा रोडलगत डिंभे उजवा कालवा परीसरात शाळेत चाललेल्या दहावीच्या विद्यार्थिनीच्या तोंडावर अज्ञात दोन व्यक्तींनी मिरची पावडर टाकल्याची घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वीही याच रस्त्यावर शालेय शिक्षण घेत असलेल्या याच विद्यार्थिनीच्या बहिणीच्या अंगावर अज्ञात व्यक्तींनी स्प्रे मारल्याचीही घटना घडली होती. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मंचरपोलिसांनी घटनास्थळी भेट देत विद्यार्थी व पालकांना धीर देत कोणी संशयस्पद व्यक्ती आढळल्यास मंचर पोलीस ठाण्याची संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
बुधवार दि २५/१०/२०२३ इयत्ता दहावीची विद्यार्थिनी तिच्या मैत्रिणीबरोबर सायकलवर येत असताना भोरवाडी कॅनॉल लगत तांबडेमळा येथे नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवर तोंड बांधून दोन अज्ञात व्यक्ती आले. त्या दोघांनी मुलीला अडवले. त्यावेळी मुलीने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मुलीची सायकल ओढून तीच्या तोंडावर व डोळ्यात मिरची पावडर टाकली. त्यावेळी तिच्याबरोबर असलेल्या मैत्रिणीने व तीने जोरजोरात आरडाओरडा केला असता ते दोघेजण पळून गेले. मिरची पावडर टाकलेल्या मुलीच्या बहिणीच्या अंगावर स्प्रे मारण्याची घटनाही याच रस्त्यावर काही दिवसांपुर्वी घडली होती. दुचाकी वर आलेले व्यक्ती कुठली आहे कोठून येते याबाबत अद्यापही कुठलीही खात्रीशीर माहिती समोर आली नाही. मात्र तांबडेमळा भोरवाडी रस्त्यावर घडलेल्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत श्री भैरवनाथ विद्यालयाचे प्राचार्य डी.डी.जाधव सर यांनी मंचर पोलीस ठाण्यात माहिती दिली असता मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देत विद्यार्थी, पालक, शिक्षक, यांच्याशी चर्चा करत पाहणी केली. मिरची पावडर टाकलेल्या विद्यार्थिनीला प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेऊन उपचार करण्यात आले आहे. दरम्यान अवसरी येथे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांनी एकजुटीने शाळेत यावे रस्त्याला, घराच्या आजूबाजूला कोणतीही अनोळखी व्यक्ती दिसल्यास पालकांना, पोलीस पाटील, मंचर पोलीस यांना कळवावे. शिक्षकांनी शालेय विद्यार्थ्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात, शक्य असल्यास पुढील काही दिवस पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत सोडावे असे आवाहन मंचर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. भोरवाडी तांबडे मळा येथून अवसरी खुर्द येथे विद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. विद्यार्थि येत असलेल्या रस्त्याच्या आजूबाजूला झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने अशा घटना घडत असून अवसरी खुर्द ग्रामपंचायत यांच्या वतीने जेसीबीच्या साह्याने रस्त्याच्या आजूबाजूची झाडे झुडपे काढून परिसर स्वच्छ करण्याचे काम सुरू केले असल्याची माहिती सरपंच कमलेश शिंदे यांनी दिली.