मिरची, बटाटा, गाजर महागले
By admin | Published: May 8, 2017 02:59 AM2017-05-08T02:59:03+5:302017-05-08T02:59:03+5:30
गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील भाजीपाला बाजारात रविवारी आवक कमी झाल्याने बटाटा, ढोबळी मिरची, गाजर व बटाटा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील भाजीपाला बाजारात रविवारी आवक कमी झाल्याने बटाटा, ढोबळी मिरची, गाजर व बटाटा या फळभाज्यांच्या भावात वाढ झाली. तर टोमॅटो व शेवग्याचे भाव उतरले.
मागील आठवड्याच्या तुलनेत बाजारात रविवारी शेतमालाची १७० ते १८० ट्रक आवक झाली. बहुतेक भाज्यांची आवक स्थिर राहिल्याने भावात चढउतार झाला नाही. पालेभाज्यांची आवक वाढल्याने भावात घट झाली आहे. हिरवी मिरचीला प्रति दहा किलोमागे ४०० ते ५०० रुपये, बटाटा ७० ते १०० रुपये, टोमॅटो ६० ते १००, शेवगा १२०-१५० तर गाजराला २२०-२६० रुपये भाव मिळाला. कोथिंबिरीची सुमारे अडीच लाख जुड्या तर मेथीची सव्वा लाख जुडींची आवक झाली. बाजारात गौरी जातीच्या कोथिंबीरीची सुमारे ५० ते ६० हजार जुड्यांची आवक झाली. कोथिंबीरची ५०० ते ८०० रुपये तर मेथीची ४०० ते ६०० रुपये भावाने विक्री झाली.
फळांना मागणी
उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरीकांचा ओढा फळांचे सरबत, रसवंतीगृहाकडे असल्याने रसदार फळांना मागणी कायम आहे. आंब्यासह लिंबु, मोसंबी, संत्रा, कलिंगड, खरबुज या फळांना मागणी असल्याने भाव टिकून राहिले.
सजावटीच्या फुलांना मागणी
लग्नसराईमुळे सजावटीच्या फुलांना मागणी असल्याने मार्केटयार्डातील फुलबाजारात या फुलांच्या भावात वाढ झाली. जर्बेरा, कार्नेशियन, डच गुलाब, ग्लॅडिएटर या फुलांना चांगली मागणी आहे. तर झेंडू, गुलछडी या फुलांचे भाव मागणीअभावी उतरले.
डाळींच्या भावातील घट सुरूच
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मागील काही दिवसांपासून सुरू असलेली डाळींच्या भावातील घट आठवडाभर सुरूच राहिली. तर मागणी वाढल्याने साखरेचे भाव किंचित वाढले. खाद्यतेल, गुळ, पोहा, नारळ, साबुदाणा व इतर वस्तुंचे भाव स्थिर राहिले.
घाऊक बाजारात तुरडाळीसह इतर डाळींच्या भावात सातत्याने घट होत आहे. प्रत्येक आठवड्यात क्टिंटलमागे १०० ते ५०० रुपयांपर्यंत भाव खाली येत आहेत. मागील आठवडाभरातही हे २०० रुपयांनी कमी झाले. साखरेला काही प्रमाणात मागणी वाढल्याने क्विंटलमागे २५ रुपये वाढ झाली. मागणीअभावी खोबरेल तेलाचे भाव १५ किलोमागे १०० रुपयांनी उतरले. उलाढाल कमी झाल्याने गुळाचे भाव स्थिर राहिले. हरभरा डाळीच्या भावात घट झाल्याने बेसनाचे भाव ५० किलोमागे १०० ते १५० रुपयांनी उतरले. तर भाजक्या डाळीच्या भावातही ४० किलोमागे ६० ते ७० रुपयांची घट झाली.
नारळाला मागणी कमी असल्याने ४० ते ५० रुपयांनी भाव उतरले. हळदीची मागणीही कमी झाली असून हळकुंड व हळदीच्या भावात क्विंटलमागे सुमारे एक हजार रुपयांची घट झाली. इतर वस्तुंचे भाव स्थिर राहिले.
घाऊक बाजारातील वस्तुंचे भाव -
डाळी (क्विंटल) - तुरडाळ - ५५००-६३००
हरभरा डाळ - ७१००-७५००
उडीदडाळ - ७०००-७५००
मुगडाळ - ६०००-६५००
मसुरडाळ - ५१००-५२००
साखर - ३८२५-३८५०
बेसन (५० किलो) ३६५०-३९५०
हळद (१० किलो) ७५०-१२५०ं