चिमुकल्यांचा जातोय जीव
By admin | Published: October 4, 2016 01:24 AM2016-10-04T01:24:57+5:302016-10-04T01:24:57+5:30
गेल्या सहा महिन्यांत वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये कधी वाहनचालकाची चुकी, तर कधी पालकांचा निष्काळजीपणा बालकांच्या जीवावर बेतला आहे
पिंपरी : गेल्या सहा महिन्यांत वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये कधी वाहनचालकाची चुकी, तर कधी पालकांचा निष्काळजीपणा बालकांच्या जीवावर बेतला आहे. कामातील व्यस्तता, दुर्लक्ष, हलगर्जीपणा यांमुळे शहराच्या विविध भागांत अपघात, दुर्घटना घडल्या असून, चिमुकल्यांना जीव गमावण्याची वेळ आली आहे.
सहा महिन्यांत घडलेल्या दहा
घटनांतून बोध घेतला, तर अशा घटनांवर नियंत्रण आणणे शक्य होणार आहे, असे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
ताथवडे येथील ओम शिव कॉलनीत टेम्पोची धडक बसून झालेल्या अपघातात आरती या तीन वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाला. वडील बिगारी कामासाठी निघाले असता, खाऊचा हट्ट धरून ती वडिलांकडे धावत जात होती. त्या वेळी तेथून जाणाऱ्या टेम्पोची धडक बसली. डोक्याला जबर मार लागल्याने तिचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या ताज्या घटनेमुळे हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अशीच घटना काही महिन्यांपूर्वी याच भागात घडली होती. घराबाहेर गणपती मंदिराच्या शेडच्या सावलीत झोपवलेले सहा महिन्यांचे बालक चालकाला नजरेस न पडल्याने मोटारीच्या चाकाखाली चिरडले. ही हृदयद्रावक घटना ताथवडे येथील सुखदा कॉलनीत घडली होती. सार्थक असे दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या त्या चिमुरड्याचे नाव होते.
सहा महिन्यांच्या सार्थकला त्याच्या आजीने गणपती मंदिराच्या शेडमध्ये आणले. सार्थकची आई स्वयंपाक करीत होती. आजी बाळाला घेऊन बाहेर आली. तेथे बाळाची आत्यासुद्धा होती. थोड्या वेळाने बाळ झोपी गेले. त्याच्यावर पांघरूण घालून आजी व आत्या दोघी हात धुण्यासाठी घरात गेल्या. त्याचवेळी शेजारीच राहणारा एक जण मोटार बाहेर काढत होता. मोटार मागे घेत असताना, मोटारीच्या मागील चाकाखाली बाळ आले. काही कळण्याच्या आत ते चिरडले गेले.(प्रतिनिधी)