चीनने घेतलेली भूमिका भारतासाठी घोंगावणारे संकट, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही - शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 01:09 AM2017-08-27T01:09:01+5:302017-08-27T01:10:31+5:30
चीनने घेतलेली भूमिका भारतासाठी घोंगावणारे संकट आहे. या संकटाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याबाबत केंद्र सरकारने काही भूमिका घेतल्यास सर्व राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून सुसंगत पाठिंबा देण्याची गरज आहे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.
पुणे : चीनने घेतलेली भूमिका भारतासाठी घोंगावणारे संकट आहे. या संकटाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याबाबत केंद्र सरकारने काही भूमिका घेतल्यास सर्व राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून सुसंगत पाठिंबा देण्याची गरज आहे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.
श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या शताब्दी महोत्सवानिमित्त पवार यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या हस्ते सत्कार झाला. या प्रसंगी महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, सचिव शशिकांत सुतार आदी उपस्थित होते.
संरक्षणमंत्री असताना चीनसोबत केलेल्या वाटाघाटींचा संदर्भ देत पवार म्हणाले, ‘१९९१ मध्येही चीनसोबत असेच तणावाचे वातावरण होते. त्या वेळी संरक्षणमंत्री म्हणून चीनसोबत वाटाघाटी करण्याचे काम माझ्याकडे होते. चीनच्या शिष्टमंडळाशी यशस्वी वाटाघाटी झाल्या, पण या चर्चेची माहिती चीनच्या पंतप्रधानांना सांगण्यासाठी चीनला जावे लागले होते. त्या वेळी चीनच्या तत्कालीन पंतप्रधानांनी आर्थिक महासत्ता होण्यासाठी २५ वर्षे आम्ही कष्ट करणार असल्याचे सांगून, त्यानंतर आजूबाजूच्या विषयांकडे लक्ष देणार, असे वक्तव्य केले होते. त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाल्याने, आता ते डोकलामच्या माध्यमातून आजूबाजूच्या विषयांकडे प्राधान्याने पाहत आहेत.’ भाई वैद्य म्हणाले, ‘यशवंतराव चव्हाणांनंतर पवार यांच्याकडेच उत्तम प्रशासक म्हणून पाहता येईल.’