Chinchwad By Election | चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राच्या १०० मीटर परिघात निर्बंध
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 02:20 PM2023-02-25T14:20:24+5:302023-02-25T14:25:01+5:30
पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी निर्बंध लागू केले आहेत...
पिंपरी :चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम सुरू असून, २६ फेब्रुवारीला मतदार होणार आहे. मतदान केंद्राच्या १०० मीटर परिघात पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी निर्बंध लागू केले आहेत.
चिंचवड मतदारसंघातील पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील चिंचवड, सांगवी, वाकड, हिंजवडी, देहूरोड, रावेत पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ८७ इमारतींतील ५१० मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. मतदान सुरळीत व शांततेत पार पडावे, सार्वजनिक शांततेला व मालमत्तेला धोका पोहोचू नये आदींसाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
मतदान केंद्राच्या परिघात प्रतिबंधात्मक आदेश
मतदानाचा दिवस २६ फेब्रुवारी पहाटेपासून ते मतदान प्रक्रिया संपेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार या कालावधीत मतदान केंद्राच्या परिघापासून १०० मीटर सभोवतालच्या परिसरातील टपऱ्या, स्टॉल, दुकाने, वाणिज्यिक आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या कालावधीत मतदान केंद्र परिसर आणि मतदान केंद्राच्या आतील भागात कोणत्याही प्रकारची अग्निशस्त्रे, हत्यारे बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशातून पोलिस दल, संरक्षण दल, तुरुंग विभाग, बँक सुरक्षा विभाग व कायदेशीर कर्तव्य बजावत असलेल्या इतर केंद्रीय तसेच राज्य शासनाचे अधिकारी व कर्मचारी यांना वगळले आहेत.