Sharad Pawar | "निवडणूक आयोग स्वत: निर्णय घेतंय का त्यांना कोणी मार्गदर्शन करतंय..."
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 02:15 PM2023-02-22T14:15:08+5:302023-02-22T14:15:54+5:30
‘त्या’ शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवटही उठली...
पिंपरी : राष्ट्रपती राजवट उठली हाच पहाटेच्या शपथविधीचा फायदा आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकले, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. तसेच कट्टर शिवसैनिक हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विधानसभेच्या चिंचवड मतदारसंघ पोटनिवणुकीचा प्रचार शिगेला पोचला आहे. महाविकास आघाडीतर्फेही सभा, बैठका होत आहेत. त्याअनुषंगाने बुधवारी शरद पवार यांची रहाटणी येथे पत्रकार परिषद झाली. त्यावेळी ते बोलत होते.
पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवार यांना माहिती होती, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. याबाबत शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रात काहीही झालं तरी एकाच व्यक्तीचं नाव घेतलं जातं. मात्र, या शपथविधीचे काही फायदेही झाले. त्यामुळेच महाविकास आघाडीचे सरकार आले. चिंचवड मतदारसंघात भाजप विरूद्ध महाविकास आघाडी अशीच निवडणूक होईल. प्रचारासाठी नेत्यांच्या गर्दीने निवडणूक जिंकता येत नाही. गर्दी जनमानसात किती प्रभावी आहे, हे महत्त्वाचे आहे.
निवडणूक आयोगाला कोणी मार्गदर्शन करतंय का?
सत्तेचा गैरवापर करून एखाद्या पक्षाला व एखाद्या नेतृत्त्वाचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होतो त्यावेळी लोक त्या नेतृत्त्वासोबत उभे राहतात. यापूर्वीही काही पक्षांमध्ये फूट पडली. मात्र, रागाची भावना व्यक्त करण्यासाठी एखाद्या पक्षाचे नाव व चिन्ह काढून घेण्याचा प्रकार आजपर्यंत झाला नव्हता. त्यामुळे निवडणूक आयोग स्वत: निर्णय घेतंय का त्यांना कोणी मार्गदर्शन करतंय हे महत्त्वाचं आहे, असे शरद पवार म्हणाले.
राज्यपाल येथून गेल्याने मी संतुष्ट
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी असताना भगतसिंग कोश्यारी हे सातत्याने चर्चेत राहिले. आता राज्यपाल पदावर नसतानाही ते चर्चेत आहेत. याबाबत शरद पवार म्हणाले, ते येथून गेले त्यावर मी अतिशय संतुष्ट आहे. राज्यातील प्रत्येकाच्या सुरक्षेची जबाबदारी ही सरकारची आहे.
...अन् एकनाथ खडसेंकडे दिला माइक
निवडणुका जिंकण्यासाठी भाजप कोणत्याही स्तराला जाऊ शकते, असा प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले, याबाबत मी काय बोलणार? त्याबाबत सर्वांनाच माहिती आहे. तरीही तुम्हाला माहितीच पाहिजे असेल तर... असे म्हणून पवार यांनी एकनाथ खडसे यांच्याकडे माइक सोपविला. खडसे म्हणाले, अटल बिहारी वाजपेयी, सुषमा स्वराज अशा नेत्यांच्या वेळी भाजपमध्ये असलेली स्थिती आणि सध्याची स्थिती खूप वेगळी आहे.