चिंचवड, कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूक: 'अशी' करा आचारसंहिता भंगाची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 05:42 PM2023-02-04T17:42:27+5:302023-02-04T17:42:54+5:30
प्ले स्टोअरवर जाऊन ‘सी-व्हिजिल’ (cVIGIL) ॲप मोफत डाऊनलोड करता येते...
पुणे : निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणताही आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या ‘सी-व्हिजिल’ ॲपवर मतदार संघात होत असलेल्या आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी नागरिकांना नोंदविण्याची सुविधा देण्यात आली आहे. जिल्ह्यातील २०५- चिंचवड व २१५- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून दिनांक २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन, अवैध जाहिरात फलक, मतदारांना पैसे वाटप, दारु वाटप, भेट वस्तू किंवा आमिष दाखवणे, कोणत्याही प्रकारचे शस्त्र दाखवून धमकावणे आदी प्रकारच्या तक्रारी ऑनलाईन पद्धतीने करता येतील. यासाठी प्ले स्टोअरवर जाऊन ‘सी-व्हिजिल’ (cVIGIL) ॲप मोफत डाऊनलोड करता येते.
ॲप सुरु करुन त्यामध्ये छायाचित्र, व्हिडीओ किंवा ऑडिओ तयार करुन पोस्ट केल्यांनतर तक्रारीची नोंद होते. तक्रार नोंदवल्यानंतर पाच मिनीटामध्ये ही माहिती भरारी पथकाला पाठवली जाते. भरारी पथकाकडून तातडीने याबाबत चौकशी करून निवडणूक निर्णय अधिकारी यांना अहवाल सादर केला जातो आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी तातडीने त्याच्यावर कारवाई करतात तक्रारीचे स्वरुप व संख्येनुसार हा वेळ कमी-अधिक होतो.
तक्रारीचे निरसन झाल्यानंतर तक्रारदारास ॲपद्वारे संदेश जातो. याशिवाय आचारसंहिता कक्षाकडे देखील आचारसंहिता भंगा बाबत तक्रारी दाखल केल्या जाऊ शकतात, अशी माहिती उप जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी सचिन इथापे यांनी दिली.