काेराेनाच्या संशयावरुन चीनी प्रवाशाला केले पुण्यातील रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2020 02:01 PM2020-02-07T14:01:30+5:302020-02-07T14:02:20+5:30
दिल्लीहून पुण्याला आलेल्या विमानामध्ये चीनी प्रवाशाला उलट्या झाल्याने त्याला पुण्यातील नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुणे : काेराेना विषाणूने चीनमध्ये हाहाकार माजवलेला असताना भारतात या विषाणूचा प्रसार हाेऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. आज सकाळी दिल्लीवरुन पुण्याला आलेल्या एका चीनी प्रवाशाला उलट्यांचा त्रास झाल्याने त्याला संशयावरुन पुण्यातील नायडू रुग्णालयात दाखल केलं आहे. तेथे त्याची तपासणी करण्यात येत आहे.
काेराेना विषाणूमुळे चीनमध्ये पाचशेहून अधिक नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. चीनमधील वुहान प्रांतातून या विषाणूचा प्रसार झाला. भारतात हा विषाणू पसरू नये यासाठी विमानतळावर विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. आज सकाळी दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एका चीनी प्रवाशाला उलट्यांचा त्रास झाला. विमान पुण्यात उतरल्यानंतर त्या प्रवाशाला तातडीने पुण्यातील नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले. खबरदारी म्हणून त्या प्रवाशाच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
दरम्यान विमान पुण्यात उतरल्यानंतर खबरदारी म्हणून त्याचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. त्यानंतर पुन्हा या विमानाने दिल्लीला उड्डाण केले. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात भरती करण्यात आलेले २२ प्रवासी आजपर्यंत करोनासाठी निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एन आय व्ही पुणे यांनी दिल्यानंतर निरिक्षणाखाली असणा-या या प्रवाशांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ४ प्रवाशी भरती आहेत. या पैकी ३ जण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे तर एक रुग्ण कस्तुरबा रुग्णालय, मुंबई येथे भरती आहे. नागपूर येथे भरती असणाऱ्या ३ पैकी एका प्रवाशाचा नमुना आज निगेटिव्ह आला.