चिंकारा शिकार प्रकरणाचा छडा लवकरच लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:12 AM2021-09-26T04:12:36+5:302021-09-26T04:12:36+5:30
कळस : कडबनवाडी (ता. इंदापूर) येथे झालेल्या चिंकारा हरणांच्या शिकार प्रकरणाच्या तपासासाठी परिसरातील चारही बाजूचे मोबाईल रेकॉर्ड ...
कळस : कडबनवाडी (ता. इंदापूर) येथे झालेल्या चिंकारा हरणांच्या शिकार प्रकरणाच्या तपासासाठी परिसरातील चारही बाजूचे मोबाईल रेकॉर्ड तपशील व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. त्यांची तपासणी सुरू आहे. लवकरच या प्रकरणाचा छडा लागेल, असा विश्वास वनसंरक्षक राहुल पाटील यांनी व्यक्त केला
कडबनवाडी या ठिकाणी पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली असता त्यांनी ही माहिती दिली. हे प्रकरण गंभीर आहे. याचे सर्व पुरावे व धागेदोरे लवकरच हाती लागतील अशा पद्धतीने वनविभाग तपास करीत आहे. या प्रकरणाची मोबाईलच्या मनोऱ्याच्या कार्यक्षेत्रातील दूरध्वनीचे आलेले फोनचे रेकॉर्ड, तसेच किती दूरध्वनी कार्यरत होते, त्याचा डाटा व परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील सीसीटीव्ही फुटेज ग्रामपंचायती व परिसरातील चारही दिशांचे सीसीटीव्ही फुटेज हाती घेतले आहेत. परिसरातील मनोऱ्याच्या अखत्यारितील पहाटे व रात्री झालेले कॉल तपासणी चालू असून, लवकरच निष्कर्षापर्यंत पोहोचता येईल असा विश्वासदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी इंदापूर तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी अजित सूर्यवंशी, वनपाल अशोक नरुटे, वनरक्षक गणेश बागडे, एम. ए. गुरव, रणजित कारंडे, इंदापूर तालुका चिंकारा बचाव अभियानाचे प्रमुख भजनदास पवार, फ्रेंड्स ऑफ नेचर क्लबचे ॲड. सचिन राऊत, राजू भोंग उपस्थित होते.
फोटो:- कडबनवाडी येथील चिंकाराची शिकार झाली त्या परिसराची पाहणी करताना उपवनसंरक्षक संरक्षक राहुल पाटील व वन कर्मचारी.