अंगारकी चतुर्थीला चिंतामणी मंदिर राहणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:11 AM2021-02-27T04:11:42+5:302021-02-27T04:11:42+5:30
मंगळवारी अंगारकी चतुर्थी येत असल्याने अष्टविनायकापैकी एक असलेल्या तीर्थक्षेत्र थेऊर येथे हजारो भाविक दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. ...
मंगळवारी अंगारकी चतुर्थी येत असल्याने अष्टविनायकापैकी एक असलेल्या तीर्थक्षेत्र थेऊर येथे हजारो भाविक दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. त्यात मागील संकष्टी चतुर्थीवेळी गर्दी आवरताना प्रशासनाची पुरती दमछाक झाली होती. पुढच्या महिन्यात अंगारकी योग असल्याने थेऊरमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होणार. अशा वेळी जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे स्थानिकांचे लक्ष लागले होते. त्यावर शासनाने मंदिर बंद ठेवण्याच्या सूचना दिल्याची माहिती हवेलीचे अप्पर तहसीलदार चोबे यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लाॅकडाऊन घोषित झाल्यावर धार्मिक स्थळे बंद करण्यात आली. तब्बल आठ महिन्यांनंतर दिवाळीच्या मुहूर्तावर मंदिरे दर्शनासाठी खुली झाली. सुरुवातीला मर्यादित असलेल्या भाविकांनी गेल्या काही दिवसांत अनेक विक्रम केले. मागील महिन्यात आलेल्या संकष्टी चतुर्थीला थेऊरला गर्दीचा विक्रम मोडला. गणेश भक्तांमध्ये संकष्टी तसेच अंगारकी चतुर्थीचे अनन्यसाधारण महत्त्व असते. त्यामुळे भाविक दर्शनासाठी गणपती मंदिरात मोठी गर्दी करतात. सध्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. दररोज रुग्णाच्या संख्येत अधिक भर पडत आहे. थेऊर येथे मंगळवारी येणाऱ्या अंगारकी चतुर्थीस हजारो भाविक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे धोका नक्कीच वाढणार आहे. यावर जिल्हाधिकारी यांनी त्वरित निर्णय घेऊन धोका टाळावा, अशी ग्रामस्थांत चर्चा होती. यावर शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन कोरोनाचा धोका टाळण्यासाठी भाविकांसाठी पूर्णतः मंदिर बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.