'आबांची नाळ जनतेशी कायम जोडलेली असायची, रोहित तुझं खूप अभिनंदन'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 05:27 PM2022-01-19T17:27:36+5:302022-01-19T17:28:12+5:30
कवठेमहांकाळ नगरपंचायतीत राष्ट्रवादीचा विजय झाला असून रोहित पाटील यांनाही विजय मिळाला. रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनलला १०, तर शेतकरी विकास पॅनलला ६ जागांवर विजय मिळाला
पुणे - राज्यातील १०५ नगरपंचायतींपैकी ९३ नगरपंचायतींच्या ३३६ जागांसाठी आणि १९५ ग्रामपंचायतींमधील २०९ जागांसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली. कवठेमहांकाळ नगरपंचायत (kavathe mahankal nagar panchayat election 2022 result) राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर.आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी राजकारणात यशस्वी प्रवेश केला आहे. या विजयानंतर रोहित पाटील यांचं अभिनंदन करण्यात येत आहे. मात्र, भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही रोहित पाटील यांचं जाहीर अभिनंदन केलंय.
कवठेमहांकाळ नगरपंचायतीत राष्ट्रवादीचा विजय झाला असून रोहित पाटील यांनाही विजय मिळाला. रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनलला १०, तर शेतकरी विकास पॅनलला ६ जागांवर विजय मिळाला. तर एका जागी अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे. विजयानंतर रोहित पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या विजयानंतर रोहित पाटील यांना दिवंगत नेते आणि वडिल आर.आर. पाटील यांची आठवण झाली. तर, चित्रा वाघ यांनीही आर. आर. पाटील यांच्या आठवणी जागवत रोहित पाटील यांचं अभिनंदन केलंय.
रोहीत तुझं खूप अभिनंदन…
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 19, 2022
कोणतं पद असो की नसो… आबांची नाळ जनतेशी कायम जोडलेली असायची. आबांच्या पावलांवर पाऊल टाकत तू हा जनसेवेचा वारसा पुढे सुरू ठेवला.. त्याचं फळ तुला आज मिळालंय.
हे यश तुझं आहे. आज आबा असते तर त्यांना तुझा अभिमान वाटला असता…@rohitrrpatilncp
रोहीत तुझं खूप अभिनंदन… कोणतं पद असो की नसो, आबांची नाळ जनतेशी कायम जोडलेली असायची. आबांच्या पावलांवर पाऊल टाकत तू हा जनसेवेचा वारसा पुढे सुरू ठेवला. त्याचं फळ तुला आज मिळालंय. हे यश तुझं आहे, आज आबा असते तर त्यांना तुझा अभिमान वाटला असता, असे ट्विट चित्रा वाघ यांनी केलंय.
काय म्हणाले रोहित पाटील
कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलला अभूतपूर्व विजय आपण मिळवून दिलात. विजयानंतर खऱ्या अर्थाने जबाबदारी वाढते, कवठेमहांकाळ आणि परिसराच्या विकासासाठी आपण कटीबद्ध आहोत, असे रोहित पाटील यांनी विजयानंतर म्हटले आहे. तसेच, सर्वच नागरिकांचे आभार मानत आज स्वर्गीय आबांची आठवण मनात दाटून येत आहे. आबांनाही नक्कीच आजच्या विजयाचा आनंद झाला असेल, असेही ते म्हणाले.