Ministry Expand: "चित्राताई ट्विट नको, राजीनामा द्या; मंत्रिमंडळ विस्तारालाही तुम्हाला बोलावलं नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 03:16 PM2022-08-09T15:16:07+5:302022-08-09T15:16:54+5:30
भाजप आणि चित्रा वाघ यांनी त्यांच्या राजीनाम्यासाठी पुढाकार घेतला होता.
मुंबई - यवतमाळमधील शिवसेना नेते आणि बंजारा समाजाचे नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी शिंदे सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. त्यामुळे, ते आता फडणवीस आणि चंदकांत पाटील यांच्यासोबत मंत्रिमंडळात दिसणार आहे. ज्या भाजपने त्यांच्या राजीनाम्यासाठी राळ उठवली होती, आंदोलने केली होती तेच आता भाजपसोबत मंत्री असणार आहेत. त्यामुळे, भाजपाची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे. याच दरम्यान भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी एक ट्विट केलं आहे. आता, या ट्विटवरुन भूमात ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी चित्रा वाघ यांना सुनावलं आहे.
भाजप आणि चित्रा वाघ यांनी त्यांच्या राजीनाम्यासाठी पुढाकार घेतला होता. आज त्याच संजय राठोड यांना भाजपने पहिल्या रांगेत बसवून मंत्रिमंडळात स्थान देणे हे अत्यंत दुर्दैवी. चित्रा वाघ यांचं एक ट्विट आलंय, असे म्हणत तृप्ती देसाई यांनी चित्रा वाघ आणि भाजपला सुनावले आहे. तुम्ही म्हणताय लढेंगे और जितेंगे, पण पूजा चव्हाणला खरोखरंच न्याय मिळवून द्यायचा असेल तर, तात्काळ पक्षाचा राजीनामा द्या. कारण, ज्या पक्षात तुम्हाला मंत्रिमंडळ विस्ताराला बोलावलं नाही. तुम्ही ज्यांच्यावर आरोप केले, त्याच पक्षाने संजय राठोड यांना मंत्रीमंडळात स्थान दिलंय. त्यामुळे, अशा पक्षात कशाला राहता, राजीनामा द्या, तरच लोकं तुमच्या पाठिशी उभी राहतील, असेही देसाई यांनी म्हटलं आहे.
काय आहे चित्रा वाघ यांचं ट्विट
"पूजा चव्हाणच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रिपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी" असं म्हटलं आहे. तसेच लडेंगे… .जितेंगे असंही त्यांनी सांगितलं. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "पूजा चव्हाणच्या मृत्यूला कारणीभूत असणार्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रिपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास. लडेंगे….जितेंगे" असं चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
पूजा चव्हाण प्रकरण काय आहे
पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येचं प्रकरण राज्यात गाजलं होतं. पुण्यातील वानवडी भागात इमारतीतून उडी घेऊन ८ फेब्रुवारी रोजी पूजाने आत्महत्या केली होती. त्यानंतर काही ऑडिओ क्लिप्स समोर आल्याने व त्यात संजय राठोड यांचा आवाज असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आल्याने या प्रकरणाला गंभीर वळण लागलं होतं. पूजाच्या मृत्यूला संजय राठोड जबाबदार आहेत असा थेट आरोप करत भाजपच्या महिला आघाडीने कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर राठोड यांचा राजीनामा न घेतल्यास अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला तोंड उघडू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा भाजपने घेतला होता. त्यासाठी राज्यभरात आंदोलनही करण्यात आले.