पुण्यात आल्या चॉकलेटच्या राख्या, खरेदीसाठी बच्चेकंपनीची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 06:54 PM2018-08-24T18:54:15+5:302018-08-24T19:33:42+5:30
सुपरमॅन, स्पायडरमॅन, परी, बॅट-बॉल, लाईट असलेल्या अशा विविध राख्या असताना आता बाजारात चॉकलेट राखीही दाखल झाली आहे.
पुणे : सुपरमॅन, स्पायडरमॅन, परी, बॅट-बॉल, लाईट असलेल्या अशा विविध राख्या असताना आता बाजारात चॉकलेट राखीही दाखल झाली आहे. त्यामुळे राखीचा नवा पर्याय उपलब्ध झाला असून बच्चेकंपनी खुश झाल्याची बघायला मिळत आहे.
येत्या रविवारी (दि.२६) रोजी रक्षाबंधन असल्याने बाजारात विविध राख्या विक्रीस आल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे दोरा, रेशीम, लेस, मोती, मणी, रुद्राक्ष, कुंदन वापरून केल्या जाणाऱ्या राख्या मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत. अगदी दोन रुपयांपासून ते सोने, चांदी आणि हिऱ्याच्या राख्याही घेतल्या जातात.यात थोडासा बदल म्हणून खाता येतील अशा चॉकलेटच्या राख्याही नव्याने आल्या आहेत. चॉकलेट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडत असल्यामुळे या राख्यांना उत्तरं प्रतिसाद मिळत आहे.
साधारणपणे दाबले गेले तर गोळा होणारे, वितळणारे चॉकलेट यात वापरण्यात आले नसल्याने या राख्या चार ते पाच दिवस उत्तम स्थितीत फ्रिजशिवाय टिकतात. भाऊ-बहीण अर्धीअर्धी करून वरचे चॉकलेट खाऊ शकतात. इतकेच नव्हे तर वरचे चॉकलेट खाल्ल्यावर उर्वरित राखी नेहमीच्या राखीप्रमाणे हवी तितके दिवस हातावर ठेवता येते. याबाबत चॉकलेट राखीची निर्मिती करणारे विक्रम मूर्थी म्हणाले की, गेले तीन वर्ष मी या संकल्पनेवर काम करत आहे. यंदा प्रथमच हव्या तशा राख्या बनल्या असून त्याला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद आहे.