विरोधी पक्षनेतेपदी चेतन तुपे यांची निवड
By admin | Published: March 9, 2017 04:23 AM2017-03-09T04:23:03+5:302017-03-09T04:23:03+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गटनेतेपदी पक्षाचे ज्येष्ठ सदस्य चेतन तुपे यांची निवड बुधवारी करण्यात आली. या निवडीमुळे तुपे यांना सभागृहात विरोधी पक्षनेतेपदाचा मान मिळणार आहे.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गटनेतेपदी पक्षाचे ज्येष्ठ सदस्य चेतन तुपे यांची निवड बुधवारी करण्यात आली. या निवडीमुळे तुपे यांना सभागृहात विरोधी पक्षनेतेपदाचा मान मिळणार आहे. महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळवून सत्तेवर आलेल्या भाजपाच्या कामकाजावर बारकाईने लक्ष ठेवण्याची जबाबदारी विरोधी पक्षनेता म्हणून तुपे यांना पार पाडावी लागेल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बुधवारी विभागीय आयुक्तांकडे नोंदणी केली. पक्षाचे ३९ सदस्य व २ अपक्षांचा पाठिंबा, अशा ४१ सदस्यांची नोंदणी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. पक्षाच्या नगरसेवकांनी विरोधी पक्ष म्हणून प्रभावीपणे काम पार पाडावे. ज्येष्ठ सदस्यांनी नवीन सदस्यांना मार्गदर्शन करावे, अशा सूचना पक्षाच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी या वेळी केल्या. पक्षाच्या सदस्यांनी प्रशिक्षण शिबिर घेण्याचे नियोजन असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली.
चेतन तुपे हे सभागृहात तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. त्यांनी यापूर्वी शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये शहराचा विकास आराखडा तयार करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक रविवारी बारामती हॉस्टेल येथे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली होती. या वेळी पक्षाच्या गटनेतेपदासाठी १३ जणांनी इच्छा दर्शविली. या वेळी गटनेता निवडीचे सर्वाधिकार अजित पवार यांना देण्यात आले. अखेर बुधवारी चेतन तुपे यांच्या नावावर गटनेते म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आले. गटनेतेपदासाठी प्रशांत जगताप, दत्तात्रय धनकवडे, दीपक मानकर, विशाल तांबे, चेतन तुपे, वैशाली बनकर, नंदा लोणकर, सुमन पठारे, रेखा टिंगरे, सुनील टिंगरे, बंडू गायकवाड यांनी इच्छा दर्शविली होती.
मनसेच्या गटनेतेपदी वसंत मोरे यांची निवड
पुणे : महापालिकेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गटनेतेपदी वसंत मोरे यांची मंगळवारी निवड करण्यात आली. पालिकेवर मनसेकडून वसंत मोरे व साईनाथ बाबर हे दोन सदस्य निवडून आले आहेत. मनसेच्या गटाची विभागीय आयुक्तांकडे नोंदणी करण्यात आली आहे.