सभापतींची निवड बिनविरोध?
By admin | Published: April 11, 2017 03:33 AM2017-04-11T03:33:11+5:302017-04-11T03:33:11+5:30
स्थायी समितीच्या सभापती निवडीनंतर महापालिकेच्या विधी, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक या चार समित्यांच्या सभापतिपदासाठी
पिंपरी : स्थायी समितीच्या सभापती निवडीनंतर महापालिकेच्या विधी, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक या चार समित्यांच्या सभापतिपदासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने एकाच समितीसाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे भाजपा बहुमताच्या जोरावर समिती सभापतींची निवड बिनविरोध करण्याची शक्यता आहे.
विधी समिती सभापतिपदासाठी शारदा सोनवणे, तर उपसभापतिपदासाठी अश्विनी जाधव, शहर सुधारणा समिती सभापतिपदासाठी सागर गवळी व उपसभापतिपदासाठी शैलेश मोरे, महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी सुनीता तापकीर व राष्ट्रवादीच्या निकिता कदम यांनी तर उपसभापतिपदासाठी योगिता नागरगोजे, तसेच क्रीडा, कला,
साहित्य व सांस्कृतिक समिती सभापतिपदासाठी भाजपाचे लक्ष्मण सस्ते यांनी उमेदवारीअर्ज दाखल केले.
विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी उमेदवारीअर्ज सोमवारी दुपारी तीन ते पाचपर्यंत दाखल करण्यात आले. महिला व बालकल्याण समिती वगळता इतर कोणत्याही पक्षाने सभापतिपदासाठी अर्ज दाखल केला नाही. महापालिकेत स्पष्ट बहुमत असल्यामुळे भाजपाकडून चारही जागांवर ज्यांची नावे निश्चित केली जातील, त्यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जाते.
भाजपाकडून अर्ज भरतेवेळी महापौर नितीन काळजे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार उपस्थित होते. विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी शनिवारी निवडणूक होईल. (प्रतिनिधी)
स्पष्ट बहुमतामुळे सर्व समित्या भाजपाकडे
महापालिका निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून भाजपाने सत्ता स्थापन केली आहे. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि सत्तारूढ पक्षनेता या महत्त्वाच्या पदांची निवड झाल्यानंतर आता विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडीचे वेध लागले आहेत. महापालिकेत पाच विषय समित्या असून, त्यापैकी स्थायी समिती अध्यक्षपदी सीमा सावळे यांची बिनविरोध निवड झाली. विधी, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक या चार विषय समित्यांच्या सभापती निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे असून, बहुमतामुळे या समित्याही भाजपाकडे जाण्याची शक्यता आहे.
बँकेत पैसे असूनही खोळंबा
नोटाबंदी निर्णयानंतर नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. घरात लग्नकार्य असताना स्वत:च्या खात्यातून गरजेपुरती रक्कमही काढता येत नव्हती. रुग्णालयाचे बिल अदा करण्यातही अडचणी येत आहेत. नोटाबंदीला पाच महिने उलटल्यानंतरही अडचणी संपलेल्या नाहीत. बँकेत पैसे असूनही केवळ अधिकारी व कर्मचारी यांच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे. शनिवार व रविवारी बँकांचे सलग कामकाज बंद असल्यामुळे नागरिक सोमवार उजाडण्याची प्रतीक्षा करीत होते. मात्र, सोमवारीसुद्धा एटीएममध्ये खडखडाट असल्याने नागरिकांचा संयम सुटला.