पाल्याची आवड पाहून करिअर निवडा - वृषभनाथ कोंडेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 01:05 AM2018-06-10T01:05:35+5:302018-06-10T01:05:35+5:30
विविध प्रकारच्या बौद्धिक कौशल्यातील कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता आपल्या मुलात किती प्रमाणात आहे, हे समजून घेतले तर त्याला भविष्यात काय करायला जमेल, याचा अंदाज येतो. विद्यार्थ्यांना समुपदेशन करणारे वृषभनाथ कोंडेकर यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला संवाद...
प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची बुद्धिमत्ता असते. कोणी छान बोलू शकतो, काही जण सुंदर पद्धतीने तर्क लावतात, तर काहींना उत्तम प्रकारे मन:पटलावर चित्र रंगवता येते. काही जणांना आपला मुद्दा इतरांना व्यवस्थित पटवून देता येतो, तर काही एकांतप्रिय असतात. अशा विविध प्रकारच्या बौद्धिक कौशल्यातील कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता आपल्या मुलात किती प्रमाणात आहे, हे समजून घेतले तर त्याला भविष्यात काय करायला जमेल, याचा अंदाज येतो. विद्यार्थ्यांना समुपदेशन करणारे वृषभनाथ कोंडेकर यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला संवाद...
आजकाल दहावीनंतर काय करावे, यावर बरेचसे पालक संभ्रमात असतात. मग मुलांना किती गुण मिळतात व कोणत्या महाविद्यालयात वा शाखेत प्रवेश मिळतो, यावरून पुढील शिक्षणाचे पर्याय पाहिले जातात. १२वी व तत्सम परीक्षेनंतर मुलाने भविष्यात काय शिकायचे, हे ठरते आणि नंतर मिळेल त्या कंपनीत नोकरी व वरिष्ठ देतील त्या विभागात काम अथवा परिचयातील लोक सुचवतील त्यानुसार व्यवसाय चालू करणे, असा आयुष्याचा प्रवास सुरू होतो. यातील काही जण पुढे जातात, तर अनेक युवक-युवती अपयशी ठरतात अथवा म्हणावी तेवढी त्यांची प्रगती होत नाही. वरील पद्वत म्हणजे मिळेल त्या बसमध्ये बसणे व जमेल तसे पुढे जात राहणे असेच होते नाही का? मग आपली मुले पोहोचणार कोठे? जमेल तेथे व जमेल तसे? म्हणजेच त्यांचे आयुष्य हे ध्येयाविना पुढे जात राहते.
करिअर निवडण्यापूर्वी आई-वडिलांनी आपल्या किशोरवयीन मुलाने अजून १० वर्षांनी काय असायला हवे, याचा विचार करून शिक्षणाचे नियोजन करावे. यासाठी आई-वडिलांनी आपल्या मुलामध्ये कोणत्या प्रकारचे बौद्धिक कौशल्य आहे? मूल आयुष्यात यशस्वी कसे होईल? त्याची प्रगती कशात आहे? त्याचा दृष्टिकोन कसा आहे? तसेच, ते कशामुळे प्रेरित होते? कशा प्रकारचा व्यवसाय वा कामाच्या स्वरूपामध्ये ते समाधानी राहील? आणि काय करताना ते आनंदी राहते? याचा विचार करायला हवा.
आपण एखादी गोष्ट साध्य करायची आहे, असे ठरवले व ती मिळवली म्हणजे त्या गोष्टीसाठी आपण यशस्वी झालो. तर, तुमच्या मुलाने आत्तापर्यंतच्या आयुष्यात जे काही साध्य केले म्हणजे वरीलप्रमाणे कोठे-कोठे यश मिळविले ते आठवून पाहा. फक्त शैक्षणिक बाबीच नाही, तर सगळ्या गोष्टी विचारात घ्या. या सर्व साध्यामध्ये मुलांनी एक विशिष्ट पद्धत वापरलेली असते. ती कोणती आहे, हे पाहा. ही पद्धत म्हणजे यश कमावण्याची त्याची प्रणाली असते. काही मुले खूप तपशीलवार विचार करतात. काही इतरांकडून माहिती गोड बोलून घेतात. काही जण शारीरिक कष्ट खूप घेतात, तर काही मुले इतरांना व्यवस्थित कामाला लावतात किंवा अजूनपण पर्याय असू शकतात. ही त्याची यशस्वी होण्याची कार्यप्रणाली आपण निवडत असलेल्या करिअरमध्ये त्याला वापरता येईल का, याचा विचार करायला हवा. वरील पद्धतीचा वापर मुलांच्या प्रगतीचा आलेख पाहण्यासाठीसुद्धा करता येतो. त्याचप्रमाणे तुमचे मूल कोणत्या बाबींमुळे स्वयंपे्ररित होते याचासुद्धा विचार करायला हवा. प्रेरणा असल्याशिवाय यशाकडे वाटचाल होत नाही. मग, मुलाच्या आयुष्याचा विचार करताना त्याची स्वयंपे्ररणास्थाने कोणती आहेत, हे पाहा व ती त्याच्या करिअरमध्ये असल्यास मुले ही भविष्यात यशस्वी होण्यास नक्कीच मदत होते. मुलाला नेमके काय करायला आवडते, हेपण पाहायला हवे. काही पालकांना सामाजिक प्रतिष्ठेसाठी इंजिनिअर, डॉक्टर असेच पर्याय समोर दिसतात; पण मुलांच्या लहानपणापासूनच्या काळात कोणत्या गोष्टी करायला त्यांना जास्त आवडायचे (मोबाईल वा कॉम्प्युटर गेम्स सोडून), हे आठवा. तो गुण त्याच्यात उपजतच म्हणजे आपोआप आलेला असतो. त्यात त्याला करिअर करता आले तर त्याच्या सुप्त गुणाचा विकास होईल. माझ्या करिअर मार्गदर्शनामध्ये मी १२वी विज्ञान शाखेत चांगले गुण घेतलेल्या मुलांना कला शाखेच्या पदवीसाठी पाठवले, तर १०वीला द्वितीय श्रेणीमध्ये पास झालेला मुलगा आता इंजिनिअरिंगचा डिप्लोमा यशस्विरीत्या पूर्ण करीत आहे.