चोरट्यास वीस महिने कारावास, तिघांची सबळ पुराव्याअभावी केली निर्दोष मुक्तता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 05:21 AM2018-01-17T05:21:33+5:302018-01-17T05:21:46+5:30
कॅम्पमध्ये दोन ठिकाणी घरफोडी करून तब्बल ८८ हजार रुपयांचा ऐवज चोरणाºया सराइताला दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात मिळून २० महिने तुरुंगवास आणि ३ हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. मुजुमदार यांनी सुनावली.
पुणे : कॅम्पमध्ये दोन ठिकाणी घरफोडी करून तब्बल ८८ हजार रुपयांचा ऐवज चोरणाºया सराइताला दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात मिळून २० महिने तुरुंगवास आणि ३ हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. मुजुमदार यांनी सुनावली.
आकाश ऊर्फ झुरळ्या विठ्ठल पाटोळे (वय २२, रा. कासेवाडी) याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातून तिघांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. यातील चोरीच्या पहिल्या घटनेत आरोपींनी ४९ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरले होते. याप्रकरणी यास्मीन इस्माईल बागवान (वय ४१) यांनी खडक पोलिसांत फिर्याद दिली होती. बागवान याचा भाजीविक्रीचा व्यवसाय असून, त्यासाठी ते २० डिसेंबर २०१६ रोजी घर बंद करून बाहेर गेले होते. परत आल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला.
चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. तर, दुसरी घटना ही भवानी पेठेत १७ डिसेंबर २०१६ रोजी घडली होती. त्याप्रकरणी शकील अलीम मनियारी (वय २७, रा. कासेवाडी, भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली होती.
फिर्यादी यांच्या घरी कोणीच नसल्याचा फायदा घेत आरोपींनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम, असा ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला होता. या दोन्ही प्रकरणांत आकाश आणि त्याच्या तीन साथीदारांना अटक करण्यात आली होती.
आकाशला पहिल्या चोरीप्रकरणी ६ महिने साधा तुरुंगवास आणि ५०० रुपये दंड ठोठावण्यात आला. तर, दुसºया चोरीप्रकरणी १४ महिने साधा तुरुंगवास आणि ३ हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दोन्ही शिक्षा वेगवेगळ्या भोगायच्या असल्याचे, आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.