नाट्यसंमेलनाध्यक्षपदासाठी चुरस

By Admin | Published: November 7, 2016 01:38 AM2016-11-07T01:38:34+5:302016-11-07T01:38:34+5:30

अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी चुरस निर्माण झाली असून, सात अर्ज नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेकडे प्राप्त झाले आहेत.

Choreus for the post of Natya Sammelan | नाट्यसंमेलनाध्यक्षपदासाठी चुरस

नाट्यसंमेलनाध्यक्षपदासाठी चुरस

googlenewsNext

पुणे : अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी चुरस निर्माण झाली असून, सात अर्ज नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेकडे प्राप्त झाले आहेत. यामध्ये जयंत सावरकर, श्रीनिवास भणगे यांच्यासह अशोक समेळ, बापू लिमये, प्रवीण कुलकर्णी, विनायक केळकर, प्रशांत दळवी अशा मान्यवरांचा समावेश आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक न घेता एकमताने बिनविरोध निवड करण्याची भूमिका परिषदेने जाहीर केल्यामुळे अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे नाट्यवर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र त्यासाठी दि. १४ नोव्हेंबरची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
९७व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज पाठविण्याकरिता परिषदेच्या विविध शाखांना ५ नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. या मुदतीनंतर परिषदेच्या विविध शाखांकडून मध्यवर्तीकडे तब्बल सात अर्ज प्राप्त झाले आहेत.
नाट्य संमेलनाध्यक्षपदासाठी ज्येष्ठतेप्रमाणे जयंत सावरकर यांचा विचार व्हावा असा एक सूर नाट्य वर्तुळातून ऐकायला मिळत होता, मात्र हे पद सन्मानाने बिनविरोधपणे मिळाले तर त घेईन, असे त्यांनी जाहीर केले होते. त्यांचे नाव सुचविणारा अर्ज ठाणे शाखेकडून पाठविण्यात आला.
पुण्याच्या शाखेने श्रीनिवास भणगे यांच्या नावाचा अर्ज परिषदेकडे सादर केला आहे. सुरुवातीपासून या दोघांच्याच नावाची चर्चा ऐकायला मिळत होती. मात्र अर्ज पाठविण्याच्या अंतिम मुदतीनंतर प्रवीण कुलकर्णी, अशोक समेळ, बापू लिमये, विनायक केळकर यांची नावेही संमेलनाध्यक्षपदासाठी समोर आली आहेत. प्रशांत दळवी यांचे नाव सुचविणारा अर्ज सादर झाला, मात्र त्यांचे संमतिपत्र नसल्याने त्यांचा अर्ज ग्राह्य धरण्यात आला नाही.
संमेलनाध्यक्षपदासाठी प्रथमच सात अर्ज प्राप्त झाल्यामुळे खऱ्या अर्थाने चुरस निर्माण झाली आहे. परंतु मान्यवरांच्या या यादीत ज्येष्ठतेमुळे सावरकर यांचीच वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: Choreus for the post of Natya Sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.