पुण्यातील या चाैकात पाेलीसांसमाेरच वाजवले जातात वाहतुकीचे तीनतेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 04:18 PM2018-05-08T16:18:12+5:302018-05-08T16:18:12+5:30
पुण्यातील विश्रांतवाडी चाैकात वाहनचालकांकडून सर्रास नियम माेडले जात असताना वाहतूक पाेलीसांकडून फारशी कारवाई हाेत नसल्याचे चित्र अाहे. त्यामुळे या भागातील वाहतूकीची समस्या जटील झाली अाहे.
पुणे : पुणे तिथे काय उने असे म्हंटले जाते. सगळ्या गाेष्टींमध्ये पुणेकर नेहमीच अाघाडीवर असतात. तसेच अाता वाहतुकीचे नियम माेडण्यातही पुणेकर अाघाडीवर असल्याचे चित्र अाहे. पुण्यातील विश्रांतवाडी भागातील मुंकदराव अांबेडकर चाैकात तर वाहतूक पाेलीसांसमाेरच नियम माेडण्यात येत असून पाेलीसांकडून फारशी कारवाई हाेत नसल्याने या चाैकात वाहतुकीचे तीनतेरा वाजल्याचे चित्र अाहे.
पुण्याच्या लाेकसंख्येपेक्षा पुण्यातील वाहनांची संख्या अधिक झाली अाहे. त्यात दरराेज शेकडाे नव्या वाहनांची भर पडत अाहे. सकाळच्या तसेच संध्याकाळच्या वेळी शहरातील विविध भागात माेठी वाहतूक काेंडी पाहायला मिळते. वाहतूक पाेलीसांकडून वाहनचालकांनी नियम पाळावेत यासाठी सातत्याने जनजागृती करण्यात येते. परंतु तरीही वाहतूकीचे नियम माेठ्याप्रमाणावर ताेडले जात अाहेेत. विश्रांतवाडीतील मुख्य चाैकात तर नेहमीच नियम सर्रास ताेडले जातात. या ठिकाणचे सिग्नल हे फक्त शाेभेसाठी अाहेत की काय असाच प्रश्न अाता निर्माण हाेत अाहे. त्यातही वाहतूक पाेलीसांनी या ठिकाणची वाहतूक सुरळीत करणे तसेच वाहनचालकांना शिस्त लावणे अपेक्षित असताना, त्यांच्याकडूनही नियम माेडणाऱ्यांकडे कानाडाेळा केला जात असल्याने वाहनचालकांना नियम माेडण्यात कुठलिही चूक असल्याचे वाटत नाही. या चाैकात केव्हाही पाहिलं तरी वाहनचालक झ्रेब्रा क्राॅसिंगच्या पुढेच थांबलेले असतात. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता अाेलांडणे अवघड जाते. त्यातही सिग्नल माेडण्याचे प्रमाणही याठिकाणी माेठे अाहे.
मुकुंदराव अांबेडकर चाैकात अनेक रस्ते एकत्र येतात. धानाेरी, एअरपाेर्ट, पुण्याकडून येणारा रस्ता, तसेच अाळंदी कडून पुण्याला जाणारा रस्ता हे सर्व रस्ते या चाैकात एकत्र येतात. या सर्व भागातून पुण्याकडे जाण्यासाठी या चाैकात यावे लागते. त्यामुळे माेठी वाहतूक या भागातून हाेत असते. सकाळी तसेत संध्याकाळच्यावेळी तर माेठी वाहतूक काेंडी या भागात हाेत असते. या सर्व रस्त्यांवरुन येणारे वाहनचालक हे सिग्नल सुटण्याअाधीच पुढे येऊन थांबतात. त्यामुळे ज्यांचा सिग्नल सुटला अाहे त्यांना पुढे जाणे अवघड हाेते. अनेकदा तर निर्भिडपणे सिग्नल ताेडला जाताे. त्याचबराेबर येथील बिग बाजारच्या समाेर संघ्याकाळच्यावेळी अनधिकृत पार्किंग केले जाते. त्यामुळे सुद्धा माेठी वाहतूक काेंडी हाेत असते. परंतु वाहतूक पाेलीसांकडून कारवाई हाेत नसल्याने वाहनचालक निर्भीड झाले अाहेत.. धानाेरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनधिकृतपणे रिक्षांमधून प्रवाशांची वाहतूक केली जाते. या ठिकाणच्या मंदिर व विहारामुळे अाधीच हा रस्ता वाहतूकीसाठी फार कमी उरताे. त्यातही हे रिक्षाचालक रस्त्यातच थांबून प्रवासी घेत असल्याने वाहतूककाेंडीत भर पडत असते. या रिक्षांमधून केवळ तीन प्रवाशींची वाहतूक करणे अपेक्षित असताना 10 प्रवाशांची अनधिकृत वाहतूक केली जाते. त्यातही अनेक रिक्षांचे हेडलाईट बंद असतात तसेच काही रिक्षांना नंबर प्लेट सुद्धा नाहीत. हे सर्व वाहतूक पाेलीसांच्या समाेर चालू असताना पाेलीसांकडून सातत्याने दुर्लक्ष करण्यात येते. अांबेडकर जयंती निमित्त विविध मंडळांकडून तयार करण्यात अालेले रथही याच चाैकात ठेवण्यात अाले असून त्यांच्यावरही कुठलिच कारवाई हाेत नसल्याचे चित्र अाहे.
याबाबत विश्रांतवाडी वाहतूक विभागाचे सहायक पाेलिस निरिक्षक सी.व्ही. केंन्द्रे यांच्याशी फाेनवरुन संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.