कदमवाकवस्ती, लोणी काळभोरचे पाणी रसायनयुक्तच
By admin | Published: February 23, 2016 03:10 AM2016-02-23T03:10:45+5:302016-02-23T03:10:45+5:30
सांडपाण्यावर प्रक्रिया करून जुन्या मुठा उजव्या कालव्यातून शेतीसाठी सोडलेल्या पाण्यामुळे कदमवाकवस्ती व लोणी काळभोर गावच्या नळ-पाणीपुरवठा योजनेच्या विहिरी
लोणी काळभोर : सांडपाण्यावर प्रक्रिया करून जुन्या मुठा उजव्या कालव्यातून शेतीसाठी सोडलेल्या पाण्यामुळे कदमवाकवस्ती व लोणी काळभोर गावच्या नळ-पाणीपुरवठा योजनेच्या विहिरी व बोअरवेल बाधित झाल्या आहोत. पाझरलेल्या पाण्यात क्षार, क्लोरिन आणि इतर रसायनांचे प्रमाण आढळून आले आहे. त्यामुळे सोडलेल्या पाण्यावर प्रक्रिया केली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ग्रामपंचायतींनी पाणी शुद्ध करण्यासाठी सध्यापेक्षा अधिक काळजी न घेतल्यास भविष्यात सर्वसामान्य नागरिकांना आजारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
गेल्या महिन्यात जुन्या मुठा उजव्या कालव्यामधून शेतीला पाणी पुरविण्यास सुरुवात झाली आहे. मुंढवा येथील जॅकवेल प्रकल्पातून पाणी उचलून ते साडेसतरानळी येथे शुद्धीकरण केले जाते, असे महापालिकेचे म्हणणे आहे. परंतु, या पाण्यावर कुठलीच प्रक्रिया न करता हे मैलापाणी जसेच्या तसे कालव्यात सोडले जाते, असे पूर्व हवेलीतील नागरिकांचे म्हणणे आहे. हे पाणी अतिशय खराब असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. कालव्यालगत असलेल्या विहिरी, कूपनलिकांमधील पाणी खराब होत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. त्यामुळे लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने कालव्यांलगत असलेल्या नळपाणीपुरवठा योजनेच्या विहिरींचे पाणी पुणे येथील राज्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.
त्यांच्याकडून आलेल्या अहवालामध्ये कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीची एंजल हायस्कूल येथील विहीर, लोणी काळभोर ग्रामपंचायतीची वगरेवस्ती येथील विहीर, तर बल्लाळवस्ती येथील बोअरवेलमधील पाण्यात क्षार व क्लोरिनचे प्रमाण आढळून आले आहे. परंतु, लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या जलशुद्धीकरण केंद्रातून बाहेर पडणाऱ्या पाण्यामध्ये ही मानवी शरीरास घातक अशी रसायने आढळून आलेली नाहीत.
कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत चार ठिकाणी पाणी शुद्ध करण्यासाठी शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित आहेत. त्यामुळे सध्या तरी येथील नागरिकांना या पाण्यांमुळे कोणताही धोका नाही. परंतु, जुना कालवा बारा महिने सुरू राहणार आहे. त्यामुळे सध्या त्यातून पाणी पाझरण्याचे प्रमाण कमी आहे. भविष्यात हे प्रमाण वाढणार असून, त्या वेळी जलशुद्धीकरणाच्या खर्चाचा मोठा भार काही दोष नसतानाही या दोन्ही ग्रामपंचायतींना उचलावा लागणार आहे. (वार्ताहर)
प्रक्रिया करूनच पाणी सोडा
राज्य प्रयोगशाळेकडून पाण्याबाबत आलेल्या अहवालामध्ये या पाण्यात क्षार व क्लोरिन जास्त प्रमाणात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ही बाब मानवी जीवितासाठी गंभीर बाब असून, हे पाणी पिण्यात आले तर त्वचारोग व विविध प्रकारचे पोटाचे रोग होऊ शकतात. आम्ही आरोग्य विभागाच्या वतीने याबाबत पुणे महापालिकेशी तत्काळ पत्रव्यवहार करून पाण्यावर आवश्यक त्या सर्व प्रक्रिया करून त्यानंतर ते पाणी जुन्या कालव्यात सोडण्यात यावे, असे सांगणार असल्याचे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. भगवान पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना
सांगितले.
सलग अहवाल प्राप्त होताच दोन्ही ग्रामपंचायतींना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी कोणत्याही आजारास न घाबरता खासगी रुग्णालयात न जाता प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी यावे.
- डॉ. डी. जे. जाधव, आरोग्याधिकारी, लोणी काळभोर