शहरात सर्वत्र नाताळाचा उत्साह
By admin | Published: December 26, 2014 04:52 AM2014-12-26T04:52:42+5:302014-12-26T04:52:42+5:30
नाताळनिमित्ताने शहरातील विविध ठिकाणच्या चर्चमध्ये ख्रिस्ती समाजबांधवांनी प्रार्थना केली. एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
पिंपरी : नाताळनिमित्ताने शहरातील विविध ठिकाणच्या चर्चमध्ये ख्रिस्ती समाजबांधवांनी प्रार्थना केली. एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
नवीन कपडे परिधान करून ख्रिस्ती समाजबांधव सहकुटुंब चर्चमध्ये दाखल झाले होते. दिवसभर आनंददायी आणि उत्साहाचे वातावरण होते. पिंपरीतील अवर लेडी कन्सोलर अफ्लिक्टेड चर्च, काळेवाडीतील युनायटेड चर्च आॅफ ख्राईस्ट, कामगारनगर येथील विनियार्ड वर्कर्स चर्च, सेंट झेवियर्स चर्च, सेंट जोसेफ चर्च, ट्रिनिटी चर्च, ग्लोरियस आऊटरिच मिनिस्ट्रिज या चर्चमध्ये येशूच्या शांती संदेशावर धार्मिक प्रवचने झाली. प्रेम, दया, शांती ही येशू ख्रिस्ताची शिकवण काय आहे, या विषयी धर्मगुरूंनी उपस्थितांना संबोधित केले. तसेच सामूहिक प्रार्थना घेण्यात आली.
पिंपरी-चिंचवड बाजारपेठेतही सर्वत्र नाताळचे वातावरण होते. दुकानांमध्ये सांताक्लॉज, ख्रिसमस ट्री पहावयास मिळत होते. बाजारपेठेतील दुकानांमध्ये काचेवर हॅपी ख्रिसमसचे संदेश पहावयास मिळत होते. मोबाईल, व्हॉट्स अॅपवरसुद्धा दिवसभर हॅपी ख्रिसमसचे शुभेच्छा संदेश धडकत होते. नाताळनिमित्ताने बच्चेकंपनीला मौज लुटण्याची संधी मिळाली. चॉकलेट, ज्यूस, बर्गर, रोल्स, सॅण्डविच आणि केक ही त्यांच्यासाठी पर्वणी ठरली. शहरातील संपूर्ण वातावरण बदलून गेले होते. (प्रतिनिधी)