नाताळ देतो आशावादी जीवन जगण्याची प्रेरणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:09 AM2020-12-26T04:09:22+5:302020-12-26T04:09:22+5:30
पुणे धर्मप्रांताचे व्हीकार जनरल रेव्ह. फादर माल्कम सिक्वेरा यांचे मत ; ख्रिसमसनिमित्त कोविड योद्ध्यांचा सन्मान पुणे : प्रभू येशूने ...
पुणे धर्मप्रांताचे व्हीकार जनरल रेव्ह. फादर माल्कम सिक्वेरा यांचे मत ; ख्रिसमसनिमित्त कोविड योद्ध्यांचा सन्मान
पुणे : प्रभू येशूने हजारो वर्षांपूर्वी सगळ्यांना जगण्याची आशा दिली. संकटांना तोंड देत जीवन जगण्याची ती आशा होती. आजच्या कोविड काळात देखील अशीच परिस्थिती आहे. कोविड योद्ध्यांनी रुग्ण व गरजूंना प्रेमभावनेने जगण्याची आशा दिली. त्यामुळे नाताळच्या सणातून आशावादी जीवन जगण्याची प्रेरणा मिळते, असे मत पुणे धर्मप्रांताचे व्हीकार जनरल रेव्ह. फादर माल्कम सिक्वेरा यांनी व्यक्त केले.
विद्याभवन हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजतर्फे संस्थेच्या विद्याभवन सभागृहात ख्रिसमसनिमित्त झालेल्या कार्यक्रमात गरजूंना ५० हजार रुपयांच्या धान्याच्या किटची मदत व कोविड योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी विद्याभवनचे प्राचार्य रेव्ह. फादर सायमन डिसुझा, पुणे मनपा प्रशासकीय अधिकारी व पालक प्रतिनिधी अनिल धुमाळ उपस्थित होते.
विद्याभवनमध्ये असलेल्या ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी (डॉक्टर, पोलीस, परिचारिका, सामाजिक कार्यकर्ते, स्वच्छता कर्मचारी) कोविड काळात उल्लेखनीय कार्य केले, त्यांचा सन्मान कोविड योद्धा म्हणून करण्यात आला. कार्यक्रमाच्या नियोजनात प्रा.रवींद्र शाळू, रेव्ह. फादर रॉक ग्रीन, नॅन्सी कुटिनो, कॅथरिन भोसले, रफेला डिसुझा यांसह विद्याभवनचा शिक्षकवर्ग आदींनी सहभाग घेतला.
फादर सायमन डिसुझा म्हणाले, माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे, हा आपला धर्म आहे. दुस-यांच्या जीव वाचविणे, ही आपली पहिली जबाबदारी असणे गरजेचे आहे. मानवसेवा हीच ईश्वरसेवा मानून आपण प्रत्येकाने काम केले पाहिजे. कोरोना काळात असेच काम कोविड योद्ध्यांनी केले आहे. यंदाचा ख्रिसमस आपणही गरजू कुटुंबांना धान्याची मदत करुन करुया. ख्रिसमसच्या काळात कोणीही उपाशी राहू नये, यासाठी प्रयत्न करुया.
या वेळी कोरोना योद्ध्यांच्या वतीने रोजमेरी माने यांनी मनोगत व्यक्त केले. ख्रिसमसनिमित्त सांताक्लॉजच्या वेशात आलेल्यांनी उपस्थितांना खाऊ देत आनंदोत्सव साजरा केला. शिक्षिका एलिस यांनी सूत्रसंचालन, तर नॅन्सी कुटीनो यांनी आभार मानले.