नाताळ आला गुलाबी थंडी घेऊन; औरंगाबाद, नागपूर, जळगावचे तापमानही आले १० अंशांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 04:05 AM2017-12-25T04:05:05+5:302017-12-25T04:05:25+5:30
काश्मीर हरयाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब, उत्तर राजस्थान,पश्चिम मध्य प्रदेश आणि कच्छ या भागात थंडीची लाट जाणवत आहे़ काश्मीर खोºयात श्रीनगरमध्ये उणे २.१ इतके किमान तपमान नोंदविले गेले.
पुणे : नाताळ गुलाबी थंडी घेऊन आल्याने राज्याला हुडहुडी भरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रही चांगलाच गारठला आहे. मुंबईकरांनाही सुखद गारवा अनुभवायला मिळत आहे. रविवारी निच्चांकी तापमान गोदाकाठी नाशिकला ९़५ अंश सेल्सिअस नोंदले गेले.
गेले काही दिवस थंडी, उकाडा, ढगाळ हवामान असा सर्व ऋतुचा अनुभव एकाच दिवसात मिळाल्यानंतर, आता थंडीचा कडाका पुन्हा वाढू लागला आहे.
राज्यात विदर्भातील बहुतांश ठिकाणचे किमान तापमान१० ते ११ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाले आहे़ उत्तर महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढला असून, खान्देशही चांगलाच गारठला आहे. नाशिकच्या किमान तपमानातही पुन्हा कमालीची घट होण्यास सुरुवात झाली असून, पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे. पुणे शहरातील किमान तापमानही घटते आहे. शनिवारी या हंगामातील १०़१ इतके किमान तापमान होते़ त्यात रविवारी किंचित वाढ होऊन ते १०़६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ काही दिवस थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. त्यामुळे नववर्षांच्या सेलिब्रेशनला गुलाबी थंडीची साथ मिळणार आहे.
काश्मीर हरयाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब, उत्तर राजस्थान,पश्चिम मध्य प्रदेश आणि कच्छ या भागात थंडीची लाट जाणवत आहे़ काश्मीर खोºयात श्रीनगरमध्ये उणे २.१ इतके किमान तपमान नोंदविले गेले. पश्चिम राजस्थानमधील चुरु येथे ४़४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली़ बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाब येथे दाट धुक्यामुळे दृश्यमानता २५ मीटरपर्यंत
कमी झाली आहे़
राज्यातील प्रमुख शहरांमधील किमान तापमान
मुंबई २०़५, सांताक्रुझ १६़६, अलिबाग १७़७, रत्नागिरी १८़४, पणजी १८़८, डहाणू १७, भिरा १४़५, पुणे १०़६, जळगाव १०़२, कोल्हापूर १५़९, महाबळेश्वर १३़३, मालेगाव १०़२, नाशिक ९़५, सांगली १३़७, सातारा ११़४, सोलापूर १३़१, उस्मानाबाद १०़५, औरंगाबाद १०़४, परभणी १०़६, नांदेड १२, अकोला १०़४, अमरावती १२़६, बुलडाणा १४, ब्रह्मपुरी ९़६, चंद्रपूर १३़६, गोंदिया ९़८, नागपूर ९़८, वर्धा १०़९, यवतमाळ १३़
(अंश सेल्सिअसमध्ये)
कोल्हापुरात थंडीचा बळी
रंकाळा तलाव परिसरात तांबट कमानीजवळ ४५ वर्षांच्या फिरस्त्या पुरुषाचा मृतदेह रविवारी सकाळी जुना राजवाडा पोलिसांना आढळला. मृतदेह सीपीआर रुग्णालयात आणला असता थंडीत गारठून मृत्यू झाल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले. कोल्हापुरात थंडीचा हा पहिला बळी आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून हा फिरस्ता भटकंती करत होता. काही दिवसांपासून एका सिमेंटच्या पाईपमध्ये तो दिवस-रात्र उपाशीपोटी झोपून असायचा. पांघरूण नसल्याने थंडीने हुडहुडत तो झोपलेला असायचा. त्याचा मृत्यू हा थंडीमध्ये गारठून झाल्याचे निदान सीपीआरमधील डॉक्टरांनी केले आहे.