बारामतीतील 'क्रोमा'च्या शोरूमला आग; लॉकडाऊनमुळे बंद होता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 10:43 AM2020-04-15T10:43:39+5:302020-04-15T10:44:08+5:30
प्रशासनाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला
बारामती : बारामती शहरातील क्रोमाच्या शोरूमला बुधवारी ( दि 15) सकाळी आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने वेळीच आग आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश मिळाले.
सकाळी 8 च्या सुमारास ही आग लागली. पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाने तातडीने या ठिकाणी धाव घेतली. नगरपरिषद प्रशासनाच्या दोन, एमआयडीसीच्या एका अग्निशामक वाहनांनी ही आग आटोक्यात आणली. वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीमध्ये शोरूमच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने आग आतमध्ये पसरण्यापूर्वीच आटोक्यात आल्याने मोठे नुकसान टाळण्यात प्रशासनाला यश आले.
चार्जिंगला लावलेल्या मोबाईलमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. कोणीही जखमी झालेले नाही.
सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश शेलार, पद्मराज गंपले, आर आर भोसले, बारामती नगर पालिकेचे अग्निशामन विभाग प्रमुख महेश आगवणे, चालक आनंद शेळके, निवृत्ती जाधव, फायरमन निखिल कागडा, प्रदीप लालबिगे, मोहन शिंदे, उमेश लालबिगे आदींनी आग आटोक्यात आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली .