इतिवृत्तांत दोन वर्षांपासून पेंडिंग

By Admin | Published: April 20, 2017 06:42 AM2017-04-20T06:42:27+5:302017-04-20T06:42:27+5:30

नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभांचा इतिवृत्तांत दोन वर्षांपासून लिहिलेलाच नसल्याचा प्रकार विरोधी नगरसेवकांनी उघडकीस आणला.

Chronicles pending for two years | इतिवृत्तांत दोन वर्षांपासून पेंडिंग

इतिवृत्तांत दोन वर्षांपासून पेंडिंग

googlenewsNext

बारामती : नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभांचा इतिवृत्तांत दोन वर्षांपासून लिहिलेलाच नसल्याचा प्रकार विरोधी नगरसेवकांनी उघडकीस आणला. काही दिवसांपूर्वी इतिवृत्तांताची माहिती मागितली होती. ती वेळेत मिळाली नाही. त्याची तक्रार मुख्याधिकाऱ्यांकडे केली. त्यानंतर दोन वर्षांचा पेंडिंग इतिवृत्तांत लिहिण्यासाठी ४८ तासांचे काम हाती घेण्यात आले. काल मध्यरात्री
विरोधी नगरसेवकांसह भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नगरपालिकेत चाललेले इतिवृत्तांत लिहिण्याचे कामकाज बंद पाडले.
याबाबत आज विरोधी पक्षनेते सुनील सस्ते, नगरसेवक विष्णू चौधर, नगरसेवक जयसिंग देशमुख, भाजपाचे कार्यकर्ते नाना सातव, जहीर पठाण आदींनी या प्रकाराबाबत प्रशासनाला जाब विचारला. यासंदर्भात सुनील सस्ते यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या सभेचा इतिवृत्तांत देण्याची मागणी केली होती. परंतु, प्रशासनाकडून त्यांना माहिती मिळाली नाही. मंगळवारी मध्यरात्री २०१५ पासूनचे इतिवृत्त (प्रोसिडिंग) लिहिण्याचे काम नगरपालिकेचे कर्मचारी करीत होते. याची माहिती मिळाल्यानंतर नगरपालिकेत जाऊन काम थांबविले. त्याचे छायाचित्र, व्हिडिओ चित्रीकरणदेखील केले. या प्रकाराची तक्रार पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे करण्यात आली आहे. तसेच, जिल्हाधिकाऱ्यांनादेखील याबाबतचे निवेदन पाठविण्यात आले.
सर्वसाधारण सभा झाल्यानंतर तातडीने इतिवृत्तांत लिहिला जावा, अशी अपेक्षा आहे. मात्र, दोन वर्षांपासून इतिवृत्तांत लिहिलेला नाही. त्यामुळे या प्रकारात सभागृहात न झालेले ठरावदेखील घुसडले जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी तसा प्रकार झाला आहे. त्यामुळेच नगरपालिकेच्या कारभाराची दोन वेळा चौकशी झाली. हा प्रकार परत घडू नये, यासाठी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनादेखील निवेदन दिले.

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची नाराजी...
दरम्यान, विरोधकांनी इतिवृत्तांताबाबत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना तातडीने नगरपालिकेत बोलावण्यात आले. बहुतेक नगरसेवकांना काय प्रकार घडला आहे, याची माहिती नव्हती. त्यांना थेट तयार केलेल्या निवेदनावर सह्या करा, असे फर्मान काढले. त्यावर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. सर्व माहिती दिल्यानंतरच सह्या घेत जा, असे काही नगरसेवकांनी सुनावले. त्याचबरोबर प्रशासकीय कामकाज झाले नसेल तर त्यामध्ये आपण कशाला पडायचे, अशीदेखील विचारणा केली.

कोणताही गैरप्रकार नाही : मुख्याधिकारी
यासंदर्भात मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी सांगितले, की नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर ज्या सर्वसाधारण सभा झाल्या, त्यामध्ये पदाधिकारी निवड, अंदाजपत्रक सभांसह अन्य सभांचा समावेश आहे. त्या सभांमध्ये मंजूर झालेल्या ठरावांना १० एप्रिल रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत कायम करण्यात आले. दोन प्रकारचे सभावृत्तांत दिले जातात. सभागृहात कोण काय बोलले आणि प्रत्यक्ष ठरावाच्या प्रती नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीने दिले आहेत. यापूर्वीच्या सर्वसाधारण सभांचे इतिवृत्तांत प्रोसिडिंग बुकमध्ये लिहिलेले आहे. आता सभांच्या ठरावांचे इतिवृत्तांत नगरपालिकेच्या वेबसाईटवरदेखील प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे कोणताही गैरप्रकार झालेला नाही.

Web Title: Chronicles pending for two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.