सनईची सुरावट अन् गुलालाची उधळण!
By admin | Published: February 24, 2017 03:18 AM2017-02-24T03:18:26+5:302017-02-24T03:18:26+5:30
‘दादा जिंकलो...’, ‘छान काम केलंस!’, ‘तिथे आपला विजय निश्चित होताच रे!’, ‘दोन ठिकाणी पराभव झाला
पुणे : ‘दादा जिंकलो...’, ‘छान काम केलंस!’, ‘तिथे आपला विजय निश्चित होताच रे!’, ‘दोन ठिकाणी पराभव झाला, हरकत नाही’ असे संवाद सातत्याने कानावर पडत होते...विजयी आणि पराभुतांची चर्चा, कार्यकर्त्यांचे कौतुक...‘कार्ड छपवाले, सुट सिलवाले, समझो हो ही गया’ अशी काहीशी भावना कार्यकर्त्यांच्या देहबोलीतून जाणवत होती. वरिष्ठ नेत्यांच्या आशीर्वादासाठी विजयी उमेदवार सरसावले होते...पेढ्यांसह भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात शुभेच्छांचा अक्षरश: वर्षाव होत होता.
या वेळी कार्यालयामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले आदी वरिष्ठ नेते आवर्जून उपस्थित होते. विविध प्रभागांतील विजयी उमेदवार त्यांना आवर्जून भेटायला येऊन आशीर्वाद घेत होते. कार्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय, छत्रपती शिवाजीमहाराज आणि भारतमातेच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला होता. कार्यालयात आणि कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची, हितचिंतकांनी गर्दी केली होती. कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.
रंगीबेरंगी फुलांची सजावट
सनईच्या मंजूळ सुरांनी भारलेले वातावरण...केळीच्या पानांचे खुंट आणि रंगीबेरंगी फुलांच्या माळांनी केलेली सजावट.. कार्यकर्त्यांचा जल्लोष... सेल्फीची ‘क्लिक क्लिक’ असा अनोखा उत्साह पुण्याच्या भाजपा कार्यालयात पाहायला मिळाला आणि खऱ्या अर्थाने पक्षाचा ‘सन्मान’ झाल्याची प्रचिती आली. पुणे महानगरपालिका निवडणुकीत दणदणीत विजय मिळविल्यानंतर, कार्यालयात जल्लोषाचे वातावरण तयार झाले होते. ‘पुणेकरांचा कौल विनम्रपणे स्वीकारतो! सर्वांचे मनापासून आभार’, ‘माझं पुणं, स्मार्ट पुणं’ अशा फ्लेक्सच्या माध्यमातून भाजपाने मतदारांचे आभार मानले.