सिनेमाने हिंदी भाषा सगळीकडे पोहोचवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:13 AM2021-01-20T04:13:08+5:302021-01-20T04:13:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) हीरकमहोत्सवी वर्षांनिमित्त उभारण्यात आलेल्या २१ फूट उंचीच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) हीरकमहोत्सवी वर्षांनिमित्त उभारण्यात आलेल्या २१ फूट उंचीच्या ‘नभ अभीप्सा’ या धातू कला शिल्पाचे अनावरण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मंगळवारी (दि. १९) झाले. हिंदी भाषेच्या प्रसार-प्रचारात सिनेमा क्षेत्राचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे ते म्हणाले.
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक भूपेंद्र कँथोला, दूरचित्रवाणी विभागाचे अधिष्ठाता राजेंद्र पाठक, चित्रपट विभागाचे अधिष्ठाता धीरज मेश्राम आदी यावेळी उपस्थित होते.
‘नभ अभीप्सा’ धातू कला शिल्प हे जुन्या व निर्जीव साहित्यांपासून साकार करण्यात आल्याबद्दल कोश्यारी यांनी संस्थेचे कौतुक केले. ते म्हणाले की, दूरदर्शन व इतर माध्यमातून या सुंदर कलाकृतीचा प्रसार करण्यात यावा. ज्यामुळे लोक ही कलाकृती बघण्यासाठी येथे येतील. नवनिर्मिती क्षेत्रात रचना करणारे साहित्यिक, कवी, चित्रपट जगतातील कलावंत, चित्रकार आदींसाठी हे शिल्प प्रेरणास्त्रोत बनले पाहिजे.
भूपेंद्र कँथोला म्हणाले की, माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात एफटीआयआय संस्थेचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. पुणे ही चित्रपट शिक्षणाची काशी आहे. सिनेमा क्षेत्र हे कला व विज्ञान यांचा अद्भुत संगम आहे.
प्रारंभी कोश्यारी यांनी ऐतिहासिक प्रभात स्टुडिओमधील जुने व नवीन प्रकारच्या कॅमेरे, लाईट्स तसेच चित्रपट निर्मिती विषयक दुर्मिळ साहित्यांची पाहाणी केली. सिद्धार्थ शास्ता व रुचिरा कदम यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव सैय्यद रबीरश्मी यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र पाठक यांनी आभार मानले.
***