पुणे- सोलापूर महामार्गावर सिनेस्टाईल पाठलाग; पोलिसांनी स्विफ्ट कार चोरट्याला ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 12:41 PM2021-01-23T12:41:56+5:302021-01-23T12:42:09+5:30

आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी यवत, दौंड, बारामती तालुका, बिबवेवाडी पुणे शहर या पोलीस स्टेशनला जबरी चोरी, लुटमार, वाहनचोरी व इतर असे एकूण आठ गुन्हे दाखल

Cinestyle chase on Pune-Solapur highway; Police arrested a Swift car thief | पुणे- सोलापूर महामार्गावर सिनेस्टाईल पाठलाग; पोलिसांनी स्विफ्ट कार चोरट्याला ठोकल्या बेड्या

पुणे- सोलापूर महामार्गावर सिनेस्टाईल पाठलाग; पोलिसांनी स्विफ्ट कार चोरट्याला ठोकल्या बेड्या

googlenewsNext

लोणी काळभोर : पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथकाने आरणगाव ( ता. जि. अहमदनगर ) येथून एका सराईत आरोपीने चोरलेली स्विप्ट कार ८ तासात पुणे - सोलापूर महामार्गावर सिनेस्टाईल पाठलाग करून आरोपीसह ताब्यात घेतली आहे.याप्रकरणी माऊली उर्फ भावडया मच्छिंद्र बांदल ( वय ३१, रा. पारगाव, ता. दौंड, जि.पुणे ) याला अटक करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारांस आरणगाव शिवार (जि. अहमदनगर ) येथील सारंगी हॉटेलसमोरून हॉटेल मालक शिवाजी अशोक मोरे ( वय ३४, रा. आरणगाव शिवार ) यांच्या  मालकीची मारुती स्विप्ट कार (एमएच १६ बीएच ६६९६०) ही त्यांच्या हॉटेलमध्ये कामास असलेला वेटर माऊली बांदल याने चोरी करून पळवून नेली होती. तो गाडी घेऊन पेट्रोल पंपावर डिझेल भरणेसाठी गेला असता तेथील व्यवस्थापकानेे कारमध्ये अनोळखी इसम दिसल्याने तात्काळ  स्विप्ट मालकास फोन केला असता त्यांनी स्विप्ट कार डिझेल भरणेसाठी पाठविली नसल्याने त्याला तेथेच थांबवून ठेवण्यास सांगितले. परंतू मोरे तेथे गेले पोहोचण्यापुुर्वीच बांदल कारसह तेथून पळून गेला होता. त्याबाबत मोरे यांनी अहमदनगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेले तक्रारीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

घनवट यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गिरमकर, पोलीस हवालदार महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरु गायकवाड यांचे पथक पुणे - सोलापूर महामार्गावर तपास करत असताना पथकाला ऊरळी कांचन ( ता हवेली ) येथे एक नंबर नसलेली स्विप्ट कार दिसली. संशय आल्याने इशारा करुन थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु न थांबवता कार भरधाव वेगाने पुढे गेल्याने पथकाने तिचा पाठलाग करुन सहजपुर फाटा ( ता. दौंड ) च्या येथे चालक माऊली बांदलसह ती ताब्यात घेतली. त्याने ही कार आरणगाव (जि.अहमदनगर) येथून चोरल्याची कबुली दिली. हा आरोपी व गुन्हयात चोरलेली स्विप्ट कार पुढील कारवाईसाठी अहमदनगर तालुका पोलीस ठाण्याचे ताब्यात दिलेली आहे.

माऊली बांदल हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी यवत, दौंड, बारामती तालुका, बिबवेवाडी पुणे शहर या पोलीस स्टेशनला जबरी चोरी लुटमार, वाहनचोरी व इतर असे एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. सन २०१५ मध्ये तो अटकेत असताना पुणे शहर पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेला होता. तसेच त्याने ऑगस्ट २०१९ मध्ये न्हावरा - चौफुला रोड पारगाव ( ता. दौंड ) येथून ४० टन मका किंमत रुपये १२ लाख ( ट्रकसह किंमत ४२ लाख) असा मालाने भरलेला ट्रक ड्रायव्हरला मारहाण करून जबरदस्तीने चोरून नेला होता. सदर गुन्हयात अटक होऊन तो सध्या जामिनावर सुटलेला होता.

Web Title: Cinestyle chase on Pune-Solapur highway; Police arrested a Swift car thief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.