गणेशोत्सवातील देखावे पूर्ण करण्यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 04:37 AM2017-08-27T04:37:31+5:302017-08-27T04:37:49+5:30
लाडक्या बाप्पाचे जल्लोष अन् उत्साहात स्वागत केल्यानंतर आता घरोघरी गणेशभक्त ‘श्रीं’च्या सेवेत मग्न झाले आहेत, तर बहुतेक सार्वजनिक गणेश मंडळांनी देखावे पाहण्यासाठी खुले करण्याची लगबग सुरू झाली आहे.
पुणे : लाडक्या बाप्पाचे जल्लोष अन् उत्साहात स्वागत केल्यानंतर आता घरोघरी गणेशभक्त ‘श्रीं’च्या सेवेत मग्न झाले आहेत, तर बहुतेक सार्वजनिक गणेश मंडळांनी देखावे पाहण्यासाठी खुले करण्याची लगबग सुरू झाली आहे. गणेशोत्सवातील दुसºया दिवशी अनेक मंडळांनी देखाव्यांवर अखेरचा हात फिरवला. मात्र, वरुणराजाच्या हजेरीने काही मंडळांना देखावे खुले करता आले नाहीत. तसेच पावसामुळे अनेक पुणेकर देखावे पाहण्यासाठी घराबाहेर पडले नाहीत.
शहरातील गणेशोत्सव म्हटले, की ऐतिहासिक मिरवणुका आणि आकर्षक देखावे. त्यानुसार शुक्रवारी गणेश मंडळांसह घरोघरी गणरायाचे वाजत-गाजत आगमन झाले. अनेक जण दुसºया दिवसापासून शहरातील मानाचे पाच गणपती, तसेच दगडूशेठ हलवाई व इतर मोठ्या गणपतीच्या दर्शनासाठी घराबाहेर पडतात. त्याचप्रमाणे खास देखावे पाहण्यासाठी बाहेरगावाहून शहरात येणाºयांची संख्याही मोठी असते. त्यानुसार शनिवारी गणेशोत्सवातील दुसºया दिवशी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना देखावे सज्ज करण्याचे वेध लागले होते. अनेक मंडळांनी पहिल्या दिवसापासून देखावे खुले केले आहेत. विद्युत रोषणाईसह सामाजिक घटनांचा वेध घेणारे, राजकीय सद्य:स्थितीवर भाष्य करणारे, देशभक्ती, ऐतिहासिक-पौराणिक, देश-विदेशातील प्रसिद्ध कलाकृतींच्या प्रतिकृती असे विविध विषय घेऊन शहरातील गणेश मंडळे दरवर्षी आकर्षक देखावे तयार करतात. स्थिर, हलत्या तसेच जिवंत देखाव्यांमधून सामाजिक प्रबोधन करणाºया देखाव्यांचे प्रमाण मागील काही वर्षांपासून वाढत आहे. यंदाही अनेक मंडळांनी त्याला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे आकर्षक विद्युत रोषणाईकडेही मंडळाचा कल आहे.
- अनेक गणेशभक्तांनी शनिवारी कसबा, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग, केसरीवाडा या मानाच्या पाच गणपतींसह दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. पावसाळी वातावरणामुळे या ठिकाणीही तुलनेने गणेशभक्तांचे प्रमाण कमी होते. रविवारी पावसाने उघडीप दिल्यास रस्ते गर्दीने फुलून जातील.
गणरायाच्या आगमनापासूनच पावसाने हजेरी ंलावल्याने काही मंडळांना देखावे पूर्ण करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील काही मंडळांचे देखावे दुसºया दिवशीही खुले झाले नाहीत. तसेच शनिवारीही दिवसभर तसेच सायंकाळीही पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे अनेकांनी घराबाहेर न पडणेच पसंत केले. त्यामुळे रस्त्यांवर फारशी गर्दी दिसून आली नाही. मात्र, अनेकांनी पाऊस अंगावर झेलत देखावे पाहण्याचा आनंद लुटला.