मंडळांनो, परवानगी हवी? मग अटी पूर्ण करा!
By Admin | Published: August 29, 2015 03:43 AM2015-08-29T03:43:47+5:302015-08-29T03:43:47+5:30
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या रस्त्यावरील मंडपासाठीच्या आकार व अन्य अटीं महापालिकेकडून आज लागू करण्यात आल्या. या अटींनुसार आता २५ फूट रुंदीच्या रस्त्यावर १० फुटांचा,
पुणे : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या रस्त्यावरील मंडपासाठीच्या आकार व अन्य अटीं महापालिकेकडून आज लागू करण्यात आल्या. या अटींनुसार आता २५ फूट रुंदीच्या रस्त्यावर १० फुटांचा, ५० फुट रस्त्यावर २० फुटांचा व ७० फूट रस्यावर ३० फूट रुंदीचा मंडप गणेशोत्सव मंडळांना टाकता येईल.
महापालिकेच्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाच्या वतीने महापालिकेच्या सर्व सहायक आयुक्तांना आज यासंबधीचा लेखी आदेश जारी करण्यात आला. त्यात मंडपासाठीच्या अटींचा सविस्तर तपशील दिला असून, अशी परवानगी देताना मंडळांडून हमीपत्रही लिहून घ्यायचे आहे. या हमीपत्राचा नमुनाही सहायक आयुक्त कार्यालयांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. मांडवाच्या आकाराबाबत महापालिकेने घातलेल्या निर्बंधांचे, वाहतूक शाखेच्या अटींचे काटेकोर पालन करण्यात येईल. जाहिरात फलक लावताना महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची परवागनी घेण्यात येईल. गणेश विसर्जनानंतर स्वखर्चाने रस्त्यावरील मंडप तसेच कमानी, जाहिरात फलक काढून टाकण्यात येतील, असे मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी स्वाक्षरीनिशी हमीपत्रात लिहून द्यायचे आहे.
महापालिकेच्या शहरातील १५ सहायक आयुक्त कार्यालयांकडून एक खिडकी योजनेंतर्गत त्यांच्या हद्दीतील मंडळांना परवानगी देण्याचे काम होईल. मंडळांनी आपापल्या हद्दीतील पोलीस ठाण्यांकडे मंडपाच्या परवानगीसाठी अर्ज करायचा आहे. सहायक आयुक्त कार्यालयांमधील अतिक्रमण निरीक्षक, सहायक अतिक्रमण निरीक्षक यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील पोलीस ठाण्यांना भेट देऊन हे अर्ज जमा करायचे आहेत. त्यानंतर त्यांनीच वाहतूक शाखा, पोलीस ठाणे व महापालिकेचे मंडपाबाबतचे प्रचलित धोरण यानुसार संबधित मंडळांना मंडपासाठी परवानगी द्यायची आहे. (प्रतिनिधी)