स्थलांतरांना सामावून घेण्याची क्षमता नसल्याने शहरे बकाल : पाेपटराव पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 04:09 PM2019-03-12T16:09:22+5:302019-03-12T16:11:21+5:30
स्थलांतरांना सामावून घेण्याची क्षमता नसल्याने शहरे बकाल हाेत असल्याचे मत आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पाेपटराव पवार यांनी व्यक्त केले.
पुणे : स्थलांतरांना सामावून घेण्याची क्षमता नसल्याने शहरे बकाल हाेत असल्याचे मत आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पाेपटराव पवार यांनी व्यक्त केले. लाेकमतच्या सरपंच अॅवार्ड साेहळ्याला पवार उपस्थित हाेते, त्यावेळी त्यांनी लाेकमतशी खास संवाद साधला.
पवार म्हणले, आधुनिक खेड्यांची संकल्पाना गांधीजींनी मांडली हाेती. माेठी जमीन आणि जास्त लाेक हे खेड्यात आहेत हे गांधीजींनी भारत भ्रमणातून ओळखलं हाेतं. खेड्यामध्ये वसलेला भारत हा शेतीप्रधान देश आहे. गावात सुविधा दिल्यास गावातील लाेक शहरांकडे जाणार नाहीत. त्यामुळे शहरे सुरक्षित राहतील आणि गाव स्वयंभू हाेतील. पिण्याचं पाणी, शेतीचे पाणी, रस्ते, वीज, आराेग्य, शिक्षण, सामाजिक सहजीवन यासाठी आपण स्वातंत्र्याचं झेंडावंदन गेली 72 वर्षे करत आहाेत. आज जर शहरांच आणि गावांच चित्र पाहिलं तर शहरांमध्ये बकालपणा वाढताेय. शहरांची स्तलांतरीतांंना सामावून घेण्याची क्षमता संपली आहे. तर दुसरीकडे गावं ओस पडत आहेत. गावांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण, उत्तम आराेग्य, शेतीला पाणी, दळवळणाची साधना यांना अभाव असल्याने लाेक गावातून शहरांमध्ये स्तलांतर करतात. राेजगाराच्या तसेच शिक्षणाच्या संधी शहराकडे गेल्या आहेत. गावांचे माेठ्याप्रमाणावर शहरीकरण हाेत आहे. तसेच शहरांचं विस्तारिकरण हाेऊन गावं शहरात जात आहेत.
हिवरे बाजारने सर्व सुविधा गावात दिल्या. त्यामुळे शहराकडे गेलेली कुटुंब गावांकडे परत आली. गावांमध्ये याेजना कार्यक्षमपणे राबविणे गरजेचे आहे. असे झाल्यास लाेक गावांकडून शहराकडे जाणार नाहीत आणि शहराकडे जाणारे लाेंढे थांबविता येतील. यासाठी पंचायत राजव्यवस्थेचं वर्गीकरण करण्याची गरज आहे. प्रत्येक गावाची समस्याही वेगळी आहे. शहरीकरण झपाट्याने हाेणाऱ्या पंचायतींना वेगळा दर्जा देण्याची गरज आहे.