नोंदणी विभागाच्या सततच्या सर्व्हर डाऊनमुळे नागरिक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:11 AM2021-03-06T04:11:53+5:302021-03-06T04:11:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे जिल्ह्यासह राज्यभरातील दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणीचा सर्व्हर गेल्या १ मार्चपासून सतत डाऊन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे जिल्ह्यासह राज्यभरातील दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणीचा सर्व्हर गेल्या १ मार्चपासून सतत डाऊन होत आहे. यापूर्वी देखील अनेक वेळा सर्व्हर डाऊन असल्याचे दस्त नोंदणीचे काम ठप्प झाले आहे. नागरिक दिवसेंदिवस दुय्यम निबंधक कार्यालयात थांबून दस्त नोंदणी होत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
याबाबत ‘अवधुत लो फाउंडेशन’चे श्रीकांत जोशी यांनी सांगितले, नोंदणी खात्याअंतर्गत कार्यरत असणाऱ्या दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये सर्व्हर कनेक्टिव्हिटी, व इतर तांत्रिक समस्यांमुळे नागरिकांची प्रचंड प्रमाणात हेळसांड होत आहे. १ मार्चपासून पुणे शहरातील मध्यवर्ती भागात कार्यरत असणारे दुय्यम निबंधक कार्यालये क्र.१० व ११ मध्ये नोंदणी प्रक्रिया अतिशय विस्कळीत झाली आहे. हीच परिस्थिती राज्यभरात देखील आहे. सदर परिस्थितीचा आढावा घेतला असता, भारत संचार निगम लि.द्वारे पुरविण्यात आलेल्या केबल कनेक्शन राऊटर, मोडेममधील तांत्रिक बिघाड असे कारण सांगितले जाते. दस्तनोंदणी करताना एका व्यक्तीचे छायाचित्र काढण्यासाठी एक ते दीड तासाचा अवधी लागणे, अशी भीषण परिस्थिती आहे. पुण्यात गेल्या दोन दिवसांत काही दुय्यम निबंधक कार्यालयात एकही दस्तनोंदणी झाली नाही.
सर्व्हर कनेक्टीविटी विषयी तक्रार केली की, नोंदणी खात्याकडून नॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटर (NIC) कडे सर्रास बोट दाखविले जाते. राज्य शासनाला सर्वाधिक महसूल देणार विभाग असून देखील शासनाकडून किमान सोयी सुविधा पुरविता येत नाही ही खेदाची गोष्ट आहे.