रिक्षाचालक ‘लोकमत’चे सिटीझन जर्नालिस्ट, ‘आॅटो-लोकमत आॅन व्हील’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 01:42 AM2018-08-15T01:42:34+5:302018-08-15T01:42:40+5:30
रिक्षावाले काका म्हणून अभिमानाने मिरविणाऱ्या शहरातील रिक्षाचालकांना आता ‘सिटीझन जर्नालिस्ट’ अशी नवीन ओळख मिळाली आहे. ‘आॅटो-लोकमत आॅन व्हील’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमांतर्गत मंगळवारी (दि. १४) मान्यवरांचे हस्ते ‘सिटीझन जर्नालिस्ट’च्या ओळखपत्राचे वाटप करण्यात आले.
पुणे - रिक्षावाले काका म्हणून अभिमानाने मिरविणाऱ्या शहरातील रिक्षाचालकांना आता ‘सिटीझन जर्नालिस्ट’ अशी नवीन ओळख मिळाली आहे. ‘आॅटो-लोकमत आॅन व्हील’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमांतर्गत मंगळवारी (दि. १४) मान्यवरांचे हस्ते ‘सिटीझन जर्नालिस्ट’च्या ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. या वेळी रिक्षावाले काकांनी ‘लोकमत’च्या या उपक्रमाचे कौतुक करीत शहरातील घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचविण्याची ग्वाही दिली.
काही दशकांपूर्वी ‘सायकलींचे शहर’ असलेल्या पुणे शहराने अनेक स्थितंतरे पाहिले. कधी पेन्शनरांचे शहर, रिक्षांचे शहर तर कधी आयटी हब, अशी ओळखही शहराला मिळाली. हे परिवर्तन होत असताना रिक्षा आणि पुणेकर हे समीकरण बनले. आज शहरात हजारो रिक्षा रस्त्यांवरून धावतात. लाखो पुणेकरांना सेवा देतात. पालकांना आपल्या मुलांच्या सुरक्षित प्रवासाची खात्री रिक्षावाले काका देतात. आता रिक्षावाले काका घरातीलच एक सदस्य बनले आहेत. आता हेच काका ‘लोकमत’च्या परिवाराचेही सदस्य बनले आहेत. ‘आॅटो-लोकमत आॅन व्हील’ या सामाजिक उपक्रमांतर्गत शहरातील रिक्षाचालकांना ‘सिटीझन जर्नालिस्ट’ बनण्याची संधी देण्यात आली आहे. या अभिनव उपक्रमाची सुरुवात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला झाली. वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त डॉ. तेजस्वी सातपुते, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, लोकमान्य मल्टीपर्पज को-आॅपरेटिव्ह बँकेचे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव व श्री महावीर जैन विद्यालयाचे व्यवस्थापकीय संचालक युवराज शहा यांच्या हस्ते रिक्षाचालकांना ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर, वरिष्ठ महाव्यवस्थापक निनाद देसाई व महाव्यवस्थापक मिलन दर्डा यांनी मान्यवरांचे स्वागत केले. ‘लोकमत’च्या उपक्रमाचे कौतुक करताना सातपुते म्हणाल्या, की रिक्षाचालकांना सिटीझन जर्नालिस्ट म्हणून संधी देणारा हा नावीन्यपूर्ण उपक्रम आहे. शहरभर फिरताना प्रत्येक टप्प्यावर काही ना काही घटना घडत असतात. या घटना रिक्षाचालक प्रत्यक्ष पाहत असतात. या घटनांमधील वास्तव ते लोकांपर्यंत पोहोचवू शकतात. त्यामुळे हा उपक्रम स्तुत्य आहे.
सुशील जाधव म्हणाले, की पुण्यात पहिल्यांदा नवीन आलेल्या नागरिकांचा पहिला संपर्क रिक्षाचालकांशी येतो. त्यामुळे रिक्षाचालकचे त्यांचे गाईड असतात. ते शहरभर फिरत असल्याने प्रत्येक घटनेची खोलवर माहिती त्यांना असते. ही माहिती आता ‘लोकमत’च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणार आहे. या वेळी जाधव यांनी रिक्षाचालकांना डिजिटल व्यवहारांवर भर देण्याचे आवाहनही केले. तसेच, ‘एम स्वाईप’चे योगेश चव्हाण यांनी स्वाईप मशिनद्वारे व्यवहार कसे करायचे, याचे प्रात्यक्षिक दाखविले.
‘लोकमत’च्या उपक्रमाचे स्वागत केले. ‘लोकमत हे आघाडीचे व विश्वसनीय वृत्तपत्र आहे. ब्रेकिंग न्यूजच्या जमान्यात रिक्षाचालकांवर टाकलेला हा विश्वास ते नक्कीत समर्थपणे पेलतील. या उपक्रमातून रिक्षाचालकांमध्ये नेतृत्वगुण विकसित होतील. रिक्षाचालक आदर्श निर्माण करतील. या उपक्रमामुळे आता ‘लोकमत’ची रस्त्यांवर घडणाºया प्रत्येक घडामोडींवर बारकाईने लक्ष राहील.
- संजय राऊत,
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,
पुणे विभाग
देशात पहिल्या क्रमांकाचे राहण्यायोग्य शहर बनण्यात रिक्षाचालकांचाही वाटा आहे. ते पुणेकरांसाठी अभिमानाचा विषय आहेत. आजपर्यंत रिक्षावाले काका असलेली ओळख ‘लोकमत’मुळे आता सिटीझन जर्नालिस्ट अशी होणार आहे. शहरभर फिरत असल्यामुळे ते सतर्क बातमीदार म्हणून काम करू शकतील.
- युवराज शहा,
व्यवस्थापकीय संचालक
श्री महावीर जैन विद्यालय
शहरामध्ये सध्या ४० ते ५० हजार रिक्षा आहेत; पण आजपर्यंत कोणत्याही माध्यमाने रिक्षाचालकांच्या दखल घेतली नव्हती. ‘लोकमत’ने पहिल्यांदा या उपक्रमाच्या माध्यमातून आमच्यावर विश्वास दाखविला आहे. हा विश्वास आम्ही सार्थ ठरवू.
- हनुमंत थोरात, रिक्षाचालक व सिटीझन जर्नालिस्ट
पदभार स्वीकारल्यानंतर सोमवारी शहरात झालेली अभूतपूर्व वाहतूककोंडी माझ्यासाठी धडा आहे. या कोंडीची कारणे वेगवेगळी असतात; पण प्रत्यक्षात लोकापर्यंत पोहचताना ती वास्तवापासून दूर असतात. रिक्षाचालकांकडून हे वास्तव लोकांपर्यंत पोहोचेल. त्यासाठी रिक्षाचालकांनी ‘लोकमत’चे कान, नाक, डोळे होत महत्त्वाचा दुवा बनावे.
- तेजस्वी सातपुते,
पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा