नागरिक उतरले रस्त्यावर
By admin | Published: January 11, 2017 02:56 AM2017-01-11T02:56:02+5:302017-01-11T02:56:02+5:30
श्रीक्षेत्र देहूगाव प्रवेशद्वार कमान ते तळवडे हद्द शीवेपर्यंतच्या केवळ १.६० मीटर लांबीच्या ११६ नंबर राज्य महामार्गाच्या रस्त्याची जमीन भूसंपादनाचे रेंगाळलेले काम
देहूगाव : श्रीक्षेत्र देहूगाव प्रवेशद्वार कमान ते तळवडे हद्द शीवेपर्यंतच्या केवळ १.६० मीटर लांबीच्या ११६ नंबर राज्य महामार्गाच्या रस्त्याची जमीन भूसंपादनाचे रेंगाळलेले काम व पिंपरी-चिंचवड महापालिकेने जमीन हस्तांतराचा धरलेला हट्ट या लालफितीच्या कारभारात अडकलेल्या कामामुळे देहूकरांनी रस्त्यावर उतरून सुमारे तास भर रास्ता रोको आंदोलन करून रस्त्याचे काम तातडीने करावे, अशी मागणी केली.
हवेली उपविभागीय अधिकारी ज्योती कदम यांच्या वतीने अप्पल तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी लेखी पत्र देऊन एक महिन्यात रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. सुमारे दीड वर्षापूर्वी देहूगाव आळंदी हा राज्यमार्ग पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विकसित करण्यात येणार होता. या साठी महापालिकेने आर्थिक तरतूदही केली होती. मात्र महसूल विभागाकडून या रस्त्याच्या बाबतचा मोबदला व भूसंपादनाचे घोंगडे भिजत ठेवले होते. दरम्यानच्या काळात या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले. हे खड्डे पालिकेने बुजवलेदेखील. यासाठी बरीच रक्कम खर्चही केली; मात्र तरीही जमीन संपादनाचे काम पूर्ण न झाल्याने रस्त्याचे काम सुरू करण्यात त्यांनी असमर्थता दाखविली होती. यामुळे रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी वारंवार केली जात होती. मात्र प्रशासनाकडून याला कचऱ्याची टोपली दाखवली जात होती. परिणामी प्रशासनाला जाग आणण्यासाठी येथील नागरी हक्क मंच व ग्रामस्थांनी आंदोलन केले.
आंदोलनकर्त्यांनी रस्त्यांवरच ठिय्या मांडल्याने वाहनांच्या देहू- देहूरोड, देहू आळंदी रस्ता व देहू तळेगाव चाकण रस्त्यावरील वाहतुकीचा तासभर खोळंबा झाला. परिणामी या सर्व रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
या आंदोलनात नागरी हक्क जनजागृती सामाजिक मंचचे प्रकाश काळोखे, सुरेश खूर्पे,दतोबा बांगर, सरपंच सुनिता टिळेकर, उपसरपंच दिनेश बोडके, विविध कार्यकारी सोसायटीचे अभिमन्यु काळोखे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माऊली काळोखे, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्थ सुनिल मोरे, अभिजित मोरे, कैलास मोरे,अशोक मोरे, संजय मोरे, रामभाऊ मोरे, सोनाली घोडेकर, संदीप शिंदे,माजी सरपंच कृष्णा परंडवाल, कांतीलाल काळोखे, रिपाइंचे वसंत चव्हाण, भाजपाचे संजय जम्बुकर उपस्थित होते. (वार्ताहर)
खड्डे : नागरिकांना होतोय त्रास
देहू-आळंदी रस्त्याच्या कामासाठी ग्रामस्थांनी मंगळवारी केलेले रास्ता रोको आंदोलन तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी उपजिल्हाधिकारी यांच्या लेखी आश्वासनाचे पत्र दिल्यानंतर मागे घेण्यात आले. देहूगाव हद्दीतील प्रवेशद्वार कमान ते तळवडे शीव दरम्यानच्या देहू-आळंदी रस्त्याचे आणि प्रवेशद्वार कमान ते देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड शीव हद्दीपर्यंतच्या देहू-देहूरोड रस्त्याचे काम अनेक वषार्पासून रखडलेले असून तो नादुरस्त, खड्डेमय आणि अरूंद झाला असल्याने अपघातग्रस्त, मृत्यूचा सापळा बनलेल्या या मार्गाच्या कामांसाठी विविध संघटना, श्री संत तुकाराम महाराज संस्थान, स्थानिक प्रशासनासह ग्रामस्थांनी वारंवार शासनाला लेखी निवेदने देऊनही दुर्लक्षित केल्याने मंगळवारी ग्रामस्थानी सकाळी दहाच्या सुमारास प्रवेशद्वारावर रास्ता रोको आंदोलनास सकाळी दहाच्या सुमारास सुरवात केली.