स्मार्ट सिटीत नागरिकांचा सहभाग, दरमहा बैठक घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 03:37 AM2017-12-02T03:37:08+5:302017-12-02T03:37:35+5:30
स्मार्ट सिटी योजनेतील विशेष क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आलेल्या औंध-बाणेर-बालेवाडी या परिसरातील प्रकल्पांना चालना देण्यासाठी, नवे प्रकल्प विचारात यावेत यासाठी आता स्थानिक नागरिकांचा सहभाग घेण्यात येणार आहे.
पुणे : स्मार्ट सिटी योजनेतील विशेष क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आलेल्या औंध-बाणेर-बालेवाडी या परिसरातील प्रकल्पांना चालना देण्यासाठी, नवे प्रकल्प विचारात यावेत यासाठी आता स्थानिक नागरिकांचा सहभाग घेण्यात येणार आहे. त्यासाठी दरमहा नागरिकांची बैठक घेण्यात येईल. व्यापारी संघटनेने याला उत्स्फूर्त पाठिंबा दिला असून २० डिसेंबर ते १० जानेवारी दरम्यान मेळाव्याचे आयोजन करण्याचे जाहीर केले आहे.
पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी ही माहिती दिली.
स्मार्ट सिटी योजनेतच नागरिकांचा सहभाग गृहीत धरण्यात आला आहे. एखाद्या समस्येवर नागरिकांच्या प्रयत्नातून मात करणारी उपाययोजना व नंतर तिची अंमलबजावणी अशा विचारांना अनुसरूनच या दरमहा बैठका घेण्यात येतील. व्यापारी संघटनांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला शहर सल्लागार मंडळाची बैठक घेण्यात आली होती. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे तेव्हा उपस्थित होते, अशी माहिती जगताप यांनी दिली.
औंध प्रभाग कार्यालयात दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. नागरिकांबरोबरच, स्वयंसेवी संस्था, संघटना, सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते हेही यात सहभागी होऊ शकतील. औंध प्रभाग कार्यालयात झालेल्या पहिल्याच बैठकीत नागरिकांनी या कल्पनेचे स्वागत केले असून सक्रिय सहभाग देण्याचे मान्य केले आहे.
- राजेंद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी,
पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी