बेकायदा भाडेकरूंच्या वास्तव्यामुळे नागरी सुरक्षा धोक्यात
By admin | Published: June 28, 2015 12:10 AM2015-06-28T00:10:00+5:302015-06-28T00:10:00+5:30
भाडेकराराची योग्य प्रमाणात मुद्रांक शुल्क भरून, पद्धतशीर नोंद करून त्याची एक प्रत संबंधित पोलीस ठाण्याकडे देणे कायद्याने बंधनकारक आहे.
तळेगाव स्टेशन : भाडेकराराची योग्य प्रमाणात मुद्रांक शुल्क भरून, पद्धतशीर नोंद करून त्याची एक प्रत संबंधित पोलीस ठाण्याकडे देणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, हजारो लोक या नियमांचे उल्लंघन करत तळेगाव दाभाडे परिसरात वास्तव्यास असल्याने नागरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
तळेगाव दाभाडे नगर परिषद उद्योगनगरी व शैक्षणिक केंद्र म्हणून उदयास आल्यानंतर राज्य आणि परराज्यांतून तात्पुरत्या वास्तव्यास येणाऱ्या नोकरदार, शिकाऊ कामगार आणि विद्यार्थी यांची संख्या वाढली. त्यामुळे परिसरात शेकडो गृहप्रकल्प उभे राहिले. सधन स्थायिक सदनिका विकत घेऊन त्या भाडेतत्त्वावर देण्यास आर्थिक उत्पन्नाचा स्रोत म्हणून पाहू लागले. सदनिका विकत वा भाड्याने देणे-घेणे या व्यवहारात एजंटगिरीचाही उदय झाला. मध्यंतरी तळेगाव दाभाडे परिसरातून भाडेतत्त्वावर राहत असलेल्या एका संशयित नक्षलवाद्यास ताब्यात घेतल्यानंतर संबंधित घरमालकाने भाडेकरार व त्याची प्रत पद्धतशीरपणे संबंधित खात्याकडे जमा केली नसल्याने त्यालाही पोलिसांनी अटक केली. या घटनेनंतर तरी पोलीस प्रशासनाने अशा प्रकारच्या घरमालक व भाडेकरूंवर कारवाई करणे गरजेचे होते. भाडेतत्त्वावर वा मुखत्यारपत्र बनवून राहणारे अनेक ठग जबरी चोऱ्या, गुन्हे व आर्थिक फसवणूक करून, परांगदा झाल्याची उदाहरणे आहेत. मात्र, त्याची कोणतीही सखल माहिती पोलीस व घरमालकांकडे उपलब्ध नसल्याचे उघड झाले आहे. इंद्रायणी कॉलनीतील एका इमारतीमध्ये केवळ मुखत्यारपत्राद्वारे एकाच सदनिकेवर अनेक बँकांकडून कर्ज घेऊन, तसेच तळेगावातील अनेक सावकरांकडून उसनवारीने लाखो रुपये घेऊन गायब झालेल्या एका दक्षिणी फिटरचे प्रकरण गुलदस्तातच आहे. भाडेकरुंची माहिती, भाडेकराराची प्रत पोलीस यंत्रणेकडे असणे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. पिंपरी-चिंचवड, पुण्याप्रमाणेच पोलीस व प्रशासनाने कोम्बिंग आॅपरेशनद्वारे कायद्याचा बडगा उगारावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (वार्ताहर)