नागरिक, व्यावसायिकांनी शासनाच्या आदेशांचे पालन करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:10 AM2021-04-15T04:10:41+5:302021-04-15T04:10:41+5:30
सासवड : पुरंदर तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. सर्वांच्या काळजीसाठी शासनाने बंधने घातली असून व्यावसायिक, नागरिकांनी ...
सासवड : पुरंदर तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. सर्वांच्या काळजीसाठी शासनाने बंधने घातली असून व्यावसायिक, नागरिकांनी शासनाच्या आदेशांचे पालन करावे., अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन आमदार संजय जगताप यांनी केले.
बुधवारी ( दि १४ ) सासवड नगरपालिकेत तालुक्यातील सर्व शासकीय अधिका-यांची बैठक झाली. यांनतर झालेल्या पत्रकार परिषदेत आ संजय जगताप बोलत होते. यावेळी तहसीलदार रुपाली सरनोबत, मुख्याधिकारी विनोद जळक, पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप, गटविकास अधिकारी अमर माने, वैद्यकीय अधिकारी डॉ किरण राऊत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ विवेक अबनावे, पालिका आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण, नगरसेवक अजित जगताप, व्यापारी संघाचे संजय चव्हाण उपस्थित होते.
मुख्याधिकारी जळक यांनी, कोरोना संसर्गाची स्थानिक परिस्थिती पाहता सासवड, जेजुरी, नीरा शहरात व्यावसायिकांसाठी कडक निर्बंध केली आहेत. त्यानुसार गुरुवार पासून शहरातील किरणा, भाजीपाला, फळ, शेती सेवा केंद्र सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत तर चहा, दूध डेअरी, बेकरी, मटण, चिकन सकाळी ७ ते १० आणि सायंकाळी ६ ते ८ या वेळेत सुरु राहतील. हॉटेलांतून फक्त पार्सल सेवा सकाळी ७ ते स्त्री ८ पर्यंत तर हातगाड्यांवरील पदार्थांच्या पार्सल सेवा सकाळी ७ ते १० आणि सायंकाळी ६ ते ८ पर्यंत सुरु राहतील. पानालये, माव्याच्या टप-या पूर्णपणे बंद राहतील असे सांगितले.
तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेची माहिती देताना आमदार संजय जगताप यांनी तालुक्यात एकूण ६३६ बेड्स आहेत, यापैकी १९३ ऑक्सिजन, २५ व्हेंटिलेटर, २७ आयसीयू बेड आहेत. यामध्ये आयसीयूचे केवळ ३ बेड शिल्लक आहेत. आत्तापर्यंत तालुक्यात एकूण ३३ हजार १८८ नागरिकांच्या तपासण्या झाल्या आहेत. एकूण ८ हजार १५३ बांधितांपैकी ६ हजार ४८४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर १३८ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या एकूण १ हजार ५३१ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत असे सांगितले. दि १२ एप्रिल अखेर तालुक्यातील ३० हजार ७५३ नागरिकांना कोविड लसीकरण करण्यात आले आहे. यातील २८ हजार २४९ जणांना पहिला ला डोस तर २ हजार ५०४ जणांना दुसरा डोस दिला आहे. ता दररोज ५ हजार २०० डोसची उपलब्धता आहे. सर्व लसीकरण केंद्रांवर सुट्ट्यांच्या दिवशीही लसीकरण सुरु असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार जगताप यांनी केले.
सासवड आणि जेजुरी मधील आयसोलेशनमधील रुगांनी घरीच थांबणे बंधनकारक आहे., त्यांची अचानक घरी येऊन तपासणी केली जाणार आहे. घरी उपस्थित नसणा-या रुग्णावर गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा तहसीलदार सरनोबत यांनी दिला आहे.