नावनोंदणी करूनही रेमडेसिविरसाठी न मिळाल्याने नागरिक संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:10 AM2021-04-12T04:10:35+5:302021-04-12T04:10:35+5:30
पुणे : राज्यासहित पुण्यातही कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णांचे नातेवाईक या इंजेक्शनसाठी सर्वच रुग्णालयात ...
पुणे : राज्यासहित पुण्यातही कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णांचे नातेवाईक या इंजेक्शनसाठी सर्वच रुग्णालयात चौकशी करत आहेत. रुबी हॉल क्लिनिकमध्ये इंजेक्शनसाठी गेलेल्या नागरिकांची शनिवारी नावनोंदणी करून घेण्यात आली होती. मात्र, रविवारी इंजेक्शन मिळविण्याच्या आशेने रुग्णालयात पोचलेल्या नागरिकांना ऐनवेळी हे इंजेक्शन नाकारण्यात आले. त्यामुळे चिडलेल्या जवळपास ३०० नागरिकांनी रुग्णालयाच्या गेटवर संताप व्यक्त करीत रुग्णालयाचा निषेध केला.
नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, इंजेक्शनच्या शोधात असलेले अनेक नागरिक रुबी हॉल क्लिनिकमध्ये गेले होते. हे इंजेक्शन देण्याकरिता नागरिकांची नावनोंदणी करून घेण्यात आली होती. इंजेक्शन रविवारी सकाळी मिळणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले होते. नातेवाईकांच्या जीवितासाठी धावपळ करीत असलेले अनेक नागरिक सकाळपासूनच इंजेक्शनच्या आशेने रुग्णालयाबाहेर जमले होते.
क्लिनिकच्या बाहेर जवळपास ३००च्या आसपास नागरिक इंजेक्शन मिळविण्यासाठी जमा झाले होते. परंतु, नागरिकांना इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी इंजेक्शन का मिळणार नाही, असा प्रश्न उपस्थित केला असता, "रुग्णालयातील कोरोना रुग्णांसाठी आम्ही इंजेक्शन राखीव ठेवले आहेत. ते तुम्हाला देऊ शकत नाही", असे उत्तर रुग्णालय प्रशासनकडून देण्यात आले. त्यावरून मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला होता. परंतु शेवटी पोलिसांनी सर्व नागरिकांना विनंती करून परत पाठवले. जमावबंदीचे आदेश असल्याने गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
----------------
रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ
गेल्या आठवड्यापासून हे इंजेक्शन न मिळाल्याने गंभीर रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. शहरात अनेक ठिकाणी त्यासाठी प्रचंड गर्दी होती. दरम्यान, आता खासगी मेडिकल स्टोअरमध्ये या इंजेक्शनची विक्रीवर बंदी आणली असून, रूग्णालयांमध्येच हे इंजेक्शन देण्याचा निर्णय शनिवारी घेण्यात आला. सद्य:स्थितीत प्रशासन रेमडेसिविर पुरवण्याचे आश्वासन देत आहे. मात्र प्रत्यक्षात कुठेही रुग्णालयात ते उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. सरकारी आणि खासगी रुग्णालये इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे स्पष्टपणे सांगत आहेत. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागत आहे.