नागरिक कोमात, टोलवसुली मात्र जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:15 AM2021-08-21T04:15:19+5:302021-08-21T04:15:19+5:30
खेड शिवापूर : पुणे-सातारा महामार्गाची गेल्या काही दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. महामार्गासह सेवा रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना यातून मार्ग ...
खेड शिवापूर : पुणे-सातारा महामार्गाची गेल्या काही दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. महामार्गासह सेवा रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना यातून मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. त्यातच पावसाळ्याचे दिवस सुरु असून या खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. अशी परिस्थिती असतानाही रिलायन्स इन्फ्राला याचे काही सोयरसुतक राहिले नाहीच, पण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानेही आता हात टेकले आहे. एकूणच खड्ड्यातून प्रवास करताना नागरिकांना कोमात जाण्याची वेळ आली असून, टोलवसुली मात्र जोमात सुरु आहे.
दरम्यान, अपघात होऊ नये यासाठी काही स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने हे खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुणे-सातारा महामार्गाचे काम रखडलेले होते. त्यावर तोडगा निघतो ना निघतो त्यातच महामार्गावर इतक्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे की ग्रामीण भागातील एका कच्च्या रोडवरून प्रवास सुरु असल्याचा अनुभव येत आहे. पावसाळ्यामध्ये या खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहत आहे. त्यामुळे यातून मार्ग काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. एखादा खड्डा मोठा असल्याचे लक्षात न आल्याने दुचाकीस्वारांचे अपघातही झाले आहे. काही दिवसांपासून अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. या महामार्गाचा ठेका मिळालेल्या रिलायन्स इन्फ्राला याचे काहीही देणे घेणे नसल्याचे दिसत आहे. स्थानिकांनी वारंवार खड्डे बुजवण्याची मागणी करूनही देखील कंपनी प्रशासन मात्र याकडे ढुंकूनही पाहत नाही.
महामार्गाची अशी अवस्था तर सेवा रस्त्याबाबत बोलायलाच नको. पहिल्या पावसास सुरुवात झाल्यानंतर सेवा रस्त्यावरही खड्डे पडले. याचे प्रमाण इतके होते की वाहनधारकांना रस्त्यावर खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता हेच समजत नव्हते. इतक्या अडचणी असताना ठेकेदार कंपनी मात्र टोलवसुलीमध्ये गुरफटली आहे. वास्तविक महामार्गावर दिलेल्या सोयीसुविधांच्या बदलत्या टोलवसुली केली जाते. इथे मात्र सोयीसुविधा दूरच, पण टोल मात्र आधी स्वीकारले जात असल्याचे दिसते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानेही या ठेकेदार कंपनीला वारंवार सूचना केल्या, पण तरीही त्यामध्ये काहीही फरक पडला नाही. अखेर प्राधिकरणानेही कंपनीच्या आडमुठे धोरणापुढे हात टेकले आहे.
वारंवार होणारे अपघात लक्षात घेऊन गाउडदरा गावचे सरपंच राकेश गाडे, महामार्गाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे, उद्योजक राजेंद्र पवार यांनी महामार्गावरील खड्डे बुजवले.
याबाबत रस्त्याची देखभाल करणारे रिलायन्स इन्फ्राचे अधिकारी राकेश कोळी यांना संपर्क साधला असता ते म्हणाले, त्रिवेणी इन्फ्रा या कंपनीला रस्त्याच्या देखभालीचे काम दिले असून काही अडचणींमुळे हे काम बंद आहे. येत्या दोन दिवसांत माहिती घेऊन सांगतो, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली.
२० खेड शिवापूर
सातारा महार्गावरील खड्डे बुजवताना पोलीस, स्थानिक नागरिक.