लॉकडाऊनपेक्षा स्वयंशिस्तीने नागरिक आता घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:10 AM2021-04-26T04:10:41+5:302021-04-26T04:10:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लॉकडाऊन आहे, बाहेर पोलीस असतील अशा भीतीने नव्हे, तर स्वयंशिस्तीने नागरिक आता घरात थांबू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लॉकडाऊन आहे, बाहेर पोलीस असतील अशा भीतीने नव्हे, तर स्वयंशिस्तीने नागरिक आता घरात थांबू लागले आहेत़ विनाकारण प्रवास टाळणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे हे कोणाच्या धाकाने नव्हे, तर आज प्रत्येकाच्या नात्यागोत्यातील एक जण तरी कोरोनाबाधित आढळून येत असल्याने ही खबरदारी घेतली जात असल्याचे चित्र शहरात विशेषत: उपनगरांमध्ये पाहण्यास मिळत आहे़
एप्रिलच्या मध्यापासून शहरात लॉकडाऊनची कडक नियमावली जाहीर झाली. पण तत्पूर्वीच पुणे शहरात दिवसाकाठी सहा ते सात हजारांपर्यंत कोरोनाबाधित आढळून येत होते. यातील बहुतांशी रुग्ण हे शहराच्या उपनगरांमध्ये असल्याने, उपनगरांमधील एकही सोसायटी अशी नाही की, जिथे एखादा तरी रुग्ण नाही़ अशा परिस्थितीत रुग्णालयांमध्येही उपचारासाठी बेड मिळेनासे झाले़ शहरात रेडमेसिविर इंजेक्शनचा तर काही दिवसांपूर्वी ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला़ अशा बिकट परिस्थितीत विषाची परीक्षा नको अशीच भूमिका अनेकांनी घेतली़ याचा परिणाम आजमितीला शहरातील प्रत्येक रस्त्यावर पोलीस कारवाईविना गर्दी आपोआप कमी झाल्याचे दिसून आली आहे. वीकेंड लॉकडाऊनला म्हणजे शनिवार, रविवारी तर उपनगरांमध्ये रस्त्यांवर अतिशय कमी प्रमाणात नागरिक दिसून येत आहेत़
प्रशासनाने सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध आणल्याने व वर्क फॉर्म होममुळे अनेक जण विनाकारण घराबाहेर पडणे टाळत आहेत़ दुसरीकडे किराणा दुकानांनाही होम डिलेव्हरीची परवागनी असल्याने, कशासाठी दुकानात गर्दी करायची व्हॉटअपवरून यादी पाठवा व मोबाईलवरून पैसे पे करा हा साधा पर्याय अनेकांनी स्वीकारला़
आज अत्यावश्यक सेवा व ज्यांना घरातून बाहेर पडणे आवश्यकच आहे असेच नागरिक रस्त्यांवर दिसत आहेत़ तसेच जे काही इतर नागरिक बाहेर पडत आहेत त्यांची पाऊले ही लसीकरण केंद्रांकडेच असतात़ यामुळे सद्यस्थितीला लॉकडाऊन, पोलिस कारवाई पेक्षा नागरिकांनी दाखविलेली स्वयंशिस्तच शहरातील रूग्ण संख्या गेल्या आठ दिवसांत कमी करण्यास कारणीभूत ठरली आहे़ १९ एप्रिल पासून २५ एप्रिलपर्यंत शहरात एकाही दिवशी नव्या कोरोनाबाधितांची संख्या ही कोरोनामुक्त होणाऱ्यांपेक्षा जास्त नाही़