...म्हणून बाणेरमधील नागरिकांनी विजेच्या खांबांवर पेटवल्या मशाली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 09:42 AM2021-02-10T09:42:56+5:302021-02-10T09:44:05+5:30
Pune News : बाणेर-बालेवाडी हा पुणे शहरातील स्मार्ट भाग आहे
पुणे - बाणेरच्या नागरिकांनी स्मार्ट सिटीला अस्सल पुणेरी झटका दिला आहे. वारंवार तक्रार करुनही पदपथावरील दिवे सुरु केले जात नसल्याने त्यांनी चक्क या दिव्यांना मशाल लावुन या कारभाराचा निषेध केला आहे. बाणेर-सुस-म्हाळुंगे शिव (बेलाकसा सोसायटी ते पाडळे वस्ती) मेन रोडवरील लाईटच्या खांबांवरील स्ट्रीट लाईट गेले अनेक वर्षे बंद आहेत. पण तक्रारी करुनही प्रतिसाद मिळत नसल्याने अडथळ्यांना सामोरे जावे लागणारे नागरिक वैतागले होते. सोयी बरोबरच सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होत असल्याने अनेकदा नागरिकांनी अनेकदा अधिकाऱ्यांना हा प्रश्न सोडवण्याची विनंती केली होती. पण प्रतिसाद न मिळाल्याने नागरिकांनी स्मार्ट कारभाराला पुणेरी बाणा दाखवला आहे.
हे दिवे सुरू करण्यासाठी या परिसरातील नागरिकांनी मशाल मार्च काढत पालिकेच्या विद्युत खांबांवर मशाली पेटवून उजेडाची व्यवस्था केली आहे. या निषेधातुन विद्युत दिवे त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे.
रस्त्यावरील अंधारामुळे महिला, जेष्ठ नागरिक यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिसरात ॲक्सिडेंटचे प्रमाण देखील वाढले आहे. बाणेर-बालेवाडी हा पुणे शहरातील स्मार्ट भाग आहे आणि अश्या परिसरात रस्त्यांवरील लाईट सारख्या मुलभूत सुविधांचाही अभाव आहे. या भागात बहुसंख्य नागरिक हे आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. अनेक वेळा नाईट शिफ्ट्स ला जाणे-येणे या मार्गाने होते, अश्या वेळी स्ट्रीट लाईट्स नसल्यामुळे सुरक्षिततेचा मोठा धोका निर्माण झाला आहे. परंतु लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झालेले आहे.
बाणेर बालेवाडी येथील येथील स्ट्रीट लाईट्स लवकरात लवकर कनेक्शन देऊन अथवा बंद पडलेल्या लाईट्स बदलुन येथील स्ट्रीट लाईट्सचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याच्या मागणीसाठी “मशाल आंदोलन” करण्यात आले.
बाणेर सारखा भाग हा स्मार्ट सिटीमधल्या एरीया डेव्हलपमेंटचा भाग आहे. अशा भागात स्ट्रीट लाईट्स चा अभाव आणि परिणामी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होणे.आणि रस्त्यांवर मशाल घेऊन नागरिकांसाठी प्रकाशाचा पर्याय निर्माण करणे हे स्थानिक नगरसेवकांच्या निष्क्रियतेचे फळ आहे असे लहू बालवडकर यांनी सांगितले.
बेलाकसा सोसायटी भागातील स्ट्रीट लाईट्स पुढील चार दिवसांमध्ये सुरू करून परिसरातील नागरिकांची गैरसोय थांबवावी अन्यथा या निष्क्रियतेविरुद्ध तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी नागरिकांच्या वतीने देण्यात आला.