नागरिकांनो, बँकेतले व्यवहार करताना सावधानता बाळगा..!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 04:51 PM2020-04-20T16:51:18+5:302020-04-20T16:55:49+5:30
बँकेच्या नावाने बनावट मेसेज ग्राहकांना येत असून त्याद्वारे बँक अकाऊंट माहिती मिळवण्यासाठी हॅकर्सकडून प्रयत्न
पुणे : लॉकडाऊनच्या काळात मोठ्या अडचणीत सापडलेल्या बँकेच्या ग्राहकांना सरकारने मोठा दिलासा दिला. तो म्हणजे पुढील तीन महिने बँकांकडून कुठल्याही प्रकारचे इएमआय घेतले जाणार नाहीत. मात्र, त्यानंतर अनेक बँकेच्या नावाने बनावट मेसेज ग्राहकांना येत असून त्याद्वारे आपली बँक अकाऊंट माहिती मिळवण्यासाठी हॅकर्स कडून प्रयत्न केला जात आहे. दुसरीकडे ग्राहकांकडे पासवर्ड तसेच ओटीपी क्रमांकाची मागणी केली जात आहे. यापासून फसवणूक होऊ नये यासाठी नागरिकांनी सावधान राहण्याची गरज आहे.
सध्या सायबर पोलिसांकडून प्रभावीपणे नागरिकांना ऑनलाइन बँकिंग फ्रॉडला बळी पडू नका असे आवाहन करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून व्हाट्स अप हॅकर्सचे प्रमाण वाढले असल्याने व्हाट्स अप वापरणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. आता ती परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर बँकिंगविषयी काही प्रश्न समोर आहेत. विशेषत: तुमच्या गाडीचा हफ्ता राहिला असून आपल्या अकौंटचे डिटेल्स देण्यास हॅकर्सकडून सांगण्यात येते. त्यानंतर मोबाईलवर एक मेसेज पाठवून ओटीपी ची मागणी करण्यात येते. अशाप्रकारे फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. खासकरून यात ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून त्यांची फसवणूक करण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. लॉकडाऊन मध्ये ऑनलाइन बँकिंगचा आकडा तुलनेने कमी असला तरी देखील हफ्ता भरण्याच्या नावाखाली फसवणूक सुरू आहे.
.................
ग्राहकांच्या खात्याची गोपनीय माहिती बँकेकडून विचारली जात नाही. ओटीपी, पासवर्ड याबद्दल विचारले जात नाही. तुमच्या क्रेडिट, डेबिट कार्डचा क्रमांक बँक विचारत नाही. सध्या हॅकर्स जे मेसेज पाठवतात त्यात जी बँकेची वेबसाईट दिली आहे ती ग्राहकांनी व्यवस्थित तपासून घ्यावी. काही बँकांकडून मेसेज केले जातात. मात्र त्याविषयी कुठलीही शंका असल्यास बँकेच्या हेल्पलाईनवर फोन करा. संबंधित अधिकारी व्यक्तीशी संपर्क साधा. बँकेची अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेणे महत्वाचे आहे. मात्र कुठल्याही चुकीच्या माहितीला बळी पडू नका.
- अॅड. ज्ञानराज संत (उपाध्यक्ष, कन्ज्युमर अडव्हॉकेट असोसिएशन)