Maharashtra Rain Update: रेनकोट - छत्री सोबत ठेवा; पुढील ३ तासात राज्यात पावसाचा अंदाज; अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट
By श्रीकिशन काळे | Published: July 19, 2024 03:39 PM2024-07-19T15:39:04+5:302024-07-19T15:39:16+5:30
सध्या बंगालच्या उपसागरात पुन्हा तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार
पुणे: राज्यामध्ये पुन्हा पावसाला सुरवात झाली असून, कोकण, मध्यमहाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात आज (दि.१९) जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर या भागामध्ये आणि घाटमाथ्यावर मात्र रेड अलर्ट देण्यात आला आहे. लोणावळ्यात २४ तासांत १३४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर सर्वाधिक कोल्हापूर भागातील धरणक्षेत्रात ३०० मिमी पाऊस झाला.
सध्या बंगालच्या उपसागरात पुन्हा तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. आज शुक्रवारी (दि.१९) कोकण, घाटमाथा आणि विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर कोकणातील रत्नागिरी, सातारा, विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा 'रेड' अलर्ट आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे असून, राजस्थानच्या जैसलमेरपासून कोटा, गुणा, मंडला, गोपालपूर ते बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रापर्यंत तो पट्टा सक्रिय आहे. दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा आहे. तसेच महाराष्ट्राच्या मध्य भागातून पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांना जोडणारे क्षेत्र देखील सक्रिय आहे. त्यामुळे राज्यामध्ये पावसाचा अंदाज दिला आहे. पुढील ३-४ तासांमध्ये राज्यातील मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर, पुणे घाट माथ्यावर मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होत आहे. लोणावळामध्ये गेल्या २४ तासांमध्ये १३५ मिमी पावसाची नोंद झाली. ताम्हिणी घाटात १६८ मिमी, तर डुंगुरवाडीमध्ये १३३ मिमी पाऊस झाला. धरणक्षेत्रामध्ये देखील चांगला पाऊस होत आहे. कोयनामध्ये ११४ मिमी, राधानगरी १६३ मिमी, कासारी१०५ मिमी, पाटगाव ३०० मिमी पावसाची नोंद झाली.