काम करण्यासाठी सक्षम म्हणून नागरिकांनी निवडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:22 AM2021-01-13T04:22:55+5:302021-01-13T04:22:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे:- केवळ राजकीय पार्श्वभूमी लाभली म्हणून आम्ही निवडून आलो असे नाही, तर राजकारणात काम करण्यासाठी आम्ही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे:- केवळ राजकीय पार्श्वभूमी लाभली म्हणून आम्ही निवडून आलो असे नाही, तर राजकारणात काम करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, म्हणून आम्हाला नागरिकांनी निवडून दिले आहे. कोणतेही संकुचित विचार न ठेवता आजचे तरुण आणि सुशिक्षित राजकारणी एकमेकांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवून समाजाच्या तळागाळातील लोकांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. संविधानाला अपेक्षित लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी आम्ही बांधील आहोत, असा सूर विविध राजकीय पक्षांच्या आमदार आणि खासदारांनी शनिवारी (दि. ९) आयोजित परिसंवादात व्यक्त केला.
जनसेवा व्यक्तिविकास प्रतिष्ठानतर्फे स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित दोन दिवसीय परिवर्तनवादी साहित्य संमेलनात ‘भारतीय संविधान आणि आजचे राजकारण’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे उपस्थित होते. यामध्ये खासदार धैर्यशील माने, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार रोहित पवार सहभागी झाले होते. सूत्रसंचालन पत्रकार प्रसन्न जोशी यांनी केले.
आमदार रोहित पवार शेतकरी आंदोलनावर भाष्य करताना म्हणाले, कृषी कायदे हा राज्य सरकारच्या अखत्यारीत येणारा प्रश्न आहे. परंतु, केंद्र सरकार राज्य सरकारांच्या अधिकारांवर अतिक्रमण करीत संविधानात्मक तिढा निर्माण करीत आहे. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता हे कायदे केल्यामुळेच पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले आहे.
खासदार धैर्यशील माने म्हणाले, संविधानाचा सोयीस्कररीत्या अर्थ लावून केवळ राजकारण खेळले जात आहे. लोकशाहीतील पाशवी बहुमताच्या जोरावर केंद्र सरकार सर्व संविधानात्मक पदे, संस्था, तपास यंत्रणा या सगळ्याचा गैरवापर करीत आहे. शासन हे नेहमी मातृत्वाच्या भूमिकेत असावे. ज्याप्रमाणे माता दोन अपत्यांमध्ये भेदभाव करीत नाही, त्याप्रमाणे समानतेने धोरणांची आखणी करून अंमलबजावणी केली पाहिजे.
प्रास्ताविक जनसेवा व्यक्तिविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकेश धिवार यांनी केले.
-------------------------------
...पण वेळप्रसंग आला तर शिवसेना ठोकशाहीवरही उतरू शकते
औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याच्या प्रश्नावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले , प्रखर हिंदुत्व आणि संभाजीनगर ही बाळासाहेब ठाकरे असल्यापासूनची शिवसेनेची ठाम भूमिका आहे. त्यात कोणत्याही पातळीवर तडजोड होणार नाही. शिवसेनेला लोकशाहीच अपेक्षित आहे, पण वेळप्रसंगी शिवसेना ठोकशाहीवर उतरू शकते, मग ती काही वेळा शाब्दिक ठोकशाही देखील असते.
----------------------------------------------