अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीला नागरिकांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 11:49 AM2019-05-07T11:49:12+5:302019-05-07T11:54:37+5:30
अक्षय तृतीया हा साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. यादिवशी प्रामुख्याने सोने खरेदी शुभ मानली जाते.
पुणे : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सोने खरेदीसाठी लोकांमध्ये चांगला उत्साह आहे. तसेच भावही स्थिर असल्याने अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याची खरेदी वाढणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यामध्ये १० ते १५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता असल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.
अक्षय तृतीया हा साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. यादिवशी प्रामुख्याने सोने खरेदी शुभ मानली जाते. त्यामुळे काही दिवस आधीपासून लोक सोने खरेदीसाठी बुकींग करून ठेवतात. मागील काही वर्षात त्यामध्ये सातत्याने वाढ होत चालली आहेत. त्यासाठी सराफी व्यावसायिकांकडूनही आकर्षक ऑफर आणल्या जातात. यंदा सराफी बाजारात अक्षय तृतीयेचा उत्साह वाढला असल्याचे चित्र आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा उलाढाल अधिक होण्याची शक्यता आहे. सुमार दोन वर्ष बाजारात काही प्रमाणात मंदीची स्थिती होती. त्यामुळे खरेदी मंदावली होती. यंदा मात्र खरेदीत होत असून अक्षय तृतियेच्या दिवशी त्यावर कळस चढेल, असे व्यावसायिकांनी सांगितले.
सराफी व्यावसायिक वास्तुपाल रांका म्हणाले, सोने खरेदीसाठी मागील पंधरा दिवसांपासून बुकींग सुरू आहे. विविध आकर्षक ऑफर देण्यात आल्या आहेत. गुढीपाडव्यादिवशी प्रामुख्याने महाराष्ट्रातील नागरीकच सोने खरेदी करतात. पण अक्षयतृतियेला महाराष्ट्रासह विविध राज्यातील लोकांकडून सोने खरेदी केली जाते. यावर्षी निवडणुकीच धामधुम संपली आहे. सध्या लग्नसराई सुरू आहे. मागील वर्षीच्या तुलनेत खरेदीत उत्साहही दिसून येत आहे. सोने दर ३२ हजार ३०० च्या जवळपास आहेत. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणावर खरेदी होण्याची शक्यता आहे. मागील वर्षीपेक्षा यामध्ये चांगली वाढ होईल.
--------------
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १० ते १५ टक्के जास्त उलाढाल अपेक्षित आहे. सोन्याचे भाव स्थिर आहेत. नोकरदार वर्गाचे पगार झालेले असून लग्नसराईचे मुहूर्त आहेत. तसेच नागरिकांचा गुंतवणुकीकडेही कल वाढला आहे. मागील दोन वर्ष बाजारात काही प्रमाणात मंदी होती. ही स्थिती आता राहिली नसल्याने अक्षय तृतियेला मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी होईल. प्रामुख्याने दागिने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल आहे.
- सौरभ गाडगीळ
सराफी व्यावसायिक
---------------------