नागरिकांना करावी लागते ‘आधार’ साठी प्रतिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 12:10 PM2019-02-04T12:10:34+5:302019-02-04T12:13:14+5:30
काही बँक कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे...
पुणे: नागरिकांना आधारकार्ड सहज उपलब्ध व्हावेत आणि आधार यंत्रणा सुरळीत व्हावी या उद्देशाने बँक, टपाल आणि महापालिकांच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आधार केंद्र सुरू करण्यात आली. केंद्र शासनाच्या आदेशानुसार शहरासह जिल्ह्यात १५१ ठिकाणी आधार सेवा दिली जात आहे. मात्र,काही बँक कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बँकेमध्ये आधार नोंदणी आणि दुरुस्तीच्या कामासाठी नागरिकांना टोकन घेण्याचे बंधन घातले जात आहे.त्यामुळे आधारसाठी नागरिकांना प्रतिक्षा करावी लागत आहे.
शाळांमधील प्रवेश,बँके खाते अशा विविध कारणांसाठी केंद्र शासनाने आधार सक्ती केली होती.त्यामुळे नागरिकांकडून आधारकार्ड काढण्यासाठी अनेक केंद्रांवर गर्दी होत होती.त्यामुळे शहर आणि जिल्ह्यातील प्रत्येक बँकांनी त्यांच्या दहा शाखांमागे एक आधार केंद्र सुरू करावे,असे आदेश केंद्र सरकारने काढले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने ११० बँका आणि ८४ टपाल कार्यालयांमध्ये आधार नोंदणी आणि दुरुस्ती सेवा सुरू केली. दरम्यान, महापालिकांच्या क्षेत्रीय कार्यालय आणि भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या कार्यालयांमध्ये देखील आधार सेवा सुरू झाली आहे. मात्र,नागरिकांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत.
जिल्ह्यातील बहुतांश सर्वच बँका व महापालिकांच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सकाळी दहा वाजता आधारसाठी टोकन दिले जातात. गेल्या वर्षी आधारची कोंडी होत असल्याने टोकन देण्याची पद्धत तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आली होती. मात्र, सद्या:स्थितीत आधार केंद्रांची वाढती संख्या आणि आधार कार्ड काढण्यासाठी येणारे नागरिक यांची संख्या विचारात घेता टोकन घेणे बंधनकारक नाही. तरीही सकाळी दहा वाजता टोकन न घेतल्याची कारणे सांगून आधारच्या कामांसाठी आलेल्या नागरिकांना नकार दिला जातो. तसेच बँकांमध्ये केवळ आपल्या खातेधारकांनाच आधारची सेवा दिली जात असल्याची तक्रार काही नागरिकांकडून जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. शासन आदेशानुसार प्रत्येक आधार केंद्राच्या प्रवेशद्वारावर आधार फलक लावण्याचे बंधनकारक असताना पालिकांची क्षेत्रीय कार्यालयांबाहेर आणि बँकांबाहेर फलक लावले गेले नाहीत,असेही दिसून येत आहे.