‘नाइट लाइफ'मुळे नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 01:25 AM2018-10-22T01:25:51+5:302018-10-22T01:26:25+5:30

विमाननगर, कल्याणीनगर, मुंढवा व कोरेगाव पार्क परिसरात सुरू असलेल्या अनेक बारमध्ये पुन्हा एकदा ‘पब’ सुरू झाले आहेत.

Citizens Hiren by 'Night Life' | ‘नाइट लाइफ'मुळे नागरिक हैराण

‘नाइट लाइफ'मुळे नागरिक हैराण

Next

येरवडा : विमाननगर, कल्याणीनगर, मुंढवा व कोरेगाव पार्क परिसरात सुरू असलेल्या अनेक बारमध्ये पुन्हा एकदा ‘पब’ सुरू झाले आहेत. मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत सुरू राहणाऱ्या या पबमुळे या परिसरात पुन्हा एकदा ‘नाइट लाइफ’ची वाईट संस्कृती जोर धरू लागली आहे. रात्र-रात्रभर ‘डीजे’च्या मोठ्या आवाजात ‘डान्स फ्लोअर’वर थिरकणारी तरुण पिढी नशेच्या आहारी जाऊन वाया जात असून याचा स्थानिक नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पोलिसांनी या पबवर तत्काळ कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे. यामध्ये अनेक परवाना नसलेले बारही सुरू आहेत.
विमाननगर, कल्याणीनगर परिसरात अनेक बारमुळे सध्या नागरिकांना मोकळेपणाने फिरणे अशक्य झाले आहे. कोरेगाव पार्क व मुंढवा परिसरात कहरच माजला असून या भागांमध्ये असंख्य पब सुरू आहेत.
या पब व बारच्या नावावरूनच तिथे काय किळसवाणे प्रकार सुरू असतील याची कल्पना येते. यातील काही ठिकाणी हुक्का पार्लरही सुरू आहेत.
पबमध्ये रात्रभर धिंगाणा घातल्यानंतर घरी परतताना रस्त्यावरही तरुण व तोकड्या कपड्यातील तरुणींचा धिंगाणा सुरू असतो. नशेच्या अमलाखाली त्यांना कसलेही भान राहत नाही. त्यामुळे अनेकवेळा हे तरुणतरुणी रस्त्यावरच अश्लील चाळे करताना, नाचताना, धिंगाणा घालताना व वेड्यावाकड्या गाड्या चालवताना दिसतात.
अनेक वेळा या तरुणी उशिरा रात्री ‘पार्टी’ संपवून घरी परतण्यासाठी एकट्याच रिक्षा अथवा कॅबची वाट पाहत रस्त्यावर उभ्या असतात. या सर्व प्रकारांमुळे या तरुणतरुणींच्या जिवाबरोबरच इतर सामान्य नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होत असून या प्रकारांमुळे नागरिक त्रासले आहेत.
पोलिस सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत असल्याने भविष्यात एखादा गंभीर गुन्हा घडल्यास जबाबदार कोण असणार.
>पालिका अतिक्रमण विभागाचेही अक्षम्य दुर्लक्ष
पब व बारमालक हॉटेल परवाना मिळवताना पालिकेत प्रस्ताव दाखल करतेवेळी अतिशय छोटे बांधकाम दाखवतात. प्रत्यक्षात परवाना मिळाल्यानंतर अनधिकृतपणे पक्के बांधकाम करून अथवा शेड टाकून पब व हॉटेलचे आकारमान वाढवले जाते.पालिकेकडे मात्र मूळ प्रस्तावात असलेल्या बांधकामाव्यतिरिक्त मिळकतकर भरणा होत नाही. याबरोबरच पार्किंग, उद्यान, टेरेस, लॉन व लगतच्या मोकळ्या जागेत अशा परवानगी नसलेल्या ठिकाणीही टेबल मांडून सर्व 'सर्व्हिस' दिली जाते.एरवी गरीब व सामान्य नागरिकांच्या अतिक्रमणांवर कारवाईची तत्परता दाखवणारे पालिकेच्या अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचारी याबाबतीत मात्र मूग गिळून गप्प बसतात, याविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे.

Web Title: Citizens Hiren by 'Night Life'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.